दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन परतल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी रात्री मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडल्याचे समजते. या बैठकीत मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यासंर्भात नव्याने चर्चा झाल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मातोश्रीवर शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक; 'या' दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा


२ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्याचे आदेश काढले होते. मात्र, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी या बदल्या रद्द केल्या होत्या. या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे महाविकासआघाडीच्या स्थैर्यावर प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली होती. 


मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांच्या बदल्या; मातोश्रीवर पोलीस आयुक्तांची कानउघडणी 


अखेर आज संध्याकाळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयाविषयी स्पष्टीकरण दिल्याचे समजते. यानंतर शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. एकूणच राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी मिळून उद्धव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर कशाप्रकारे पडदा पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.