मुंबई : दसरा मेळाव्यासाठी (dasara melawa) शिंदे गटानं मुंबई महापालिकेला पत्र दिलंय. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटानं पत्र दिलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटानेही पत्र दिल्यानं शिंदे गटाकडून दसरा मेळावाही हायजॅक केला जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. (maharashtra political crisis dasara melawa eknath shinde group highjack)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दसरा मेळावा कुणाचा? ठाकरेंचा की शिंदेंचा, यावरून गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात खल सुरूंय. त्यातच आता शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. 


शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितलीये. विशेष म्हणजे आमदारांसोबतच्या बैठकीत तयारीला लागा अशा सूचना दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिल्या होत्या. दसरा मेळाव्याची परवानगी मागत शिंदे गटानं पुन्हा एकदा थेट मातोश्रीलाच आव्हान दिलंय. त्यामुळे ठाकरे गटही आक्रमक झालाय. 



एक पक्ष, एक मैदान, एक नेता असं बिरूद मिरवत बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची ही परंपरा उद्धव ठाकरेंनीही कायम ठेवली. मात्र यंदा शिवसेनेत सर्वात मोठं बंड झाल्यानंतर येऊ घातलेल्या दस-याला विचारांचं सोनं कोण लुटणार, याबाबत संभ्रम वाढलाय. 


दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटानं यापूर्वीच महापालिकेकडे अर्ज केलाय. त्यावर अद्याप काहीच हालचाल झालेली नाही. त्यातच आता शिंदे गटानंही परवानगी मागितल्यानं ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. शिंदे गट दसरा मेळावाही हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं आता स्पष्ट झालंय.