बंडखोर आमदाराच्या फेसबूक पेजवर स्वत:च्याच विरोधात पोस्ट
बंडखोरांपैकी एका आमदाराने चक्क स्वत: विरुद्ध फेसबूक पोस्ट करत स्वत:चा विरोध केला आहे. ही फेसबूक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या गोटात अनेक आमदार दाखल झाले. तेव्हापासून राज्यातील विविध भागांमध्ये कट्टर शिवसैनिकांनी या बंडखोर आमदारांविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं केली, पुतळे फुकले. मात्र आता असा एक प्रकार समोर आला आहे, ज्याने तुम्हाला हसू आवरणार नाही. बंडखोरांपैकी एका आमदाराने चक्क स्वत: विरुद्ध फेसबूक पोस्ट करत स्वत:चा विरोध केला आहे. ही फेसबूक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. (maharashtra political crisis rebel shiv sena mla shreeenivas wanga wrote facebook post against oneself)
तू गद्दार आहेस गद्दार, या आशयाची पोस्ट पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या फेसबूक पेजवरुन करण्यात आली आहे. स्वत:च्याच फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.
पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हेदेखील शिंदे गटात सामील झालेत. त्यांनी फेसबूकवरुन स्वतःविरोधात पोस्ट केल्यानं कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. मात्र थोड्या वेळातच याचा उलगडा झाला. वनगा यांचं फेसबुक अकाऊंट हँडल करणाऱ्या कार्यकर्त्यानंच ही पोस्ट टाकलीय. आता ही पोस्ट सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होतीय.