Maharashtra Politics : ऍड उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे (BJP) उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उज्जल निकम यांना पराभवानंतही बक्षीस
उत्तर मध्य मुंबई (Mumbai North Central Lok Sabha Election 2024) लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्जल निकम यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीसाठी उज्ज्वल निकम यांनी आपल्या विशेष सरकारी वकिल पदाचा राजीनामा दिला होता. पण पराभवानंतरही त्यांना बक्षीस मिळालं आहे. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकीलपदी पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. 


काँग्रेसने साधला निशाणा
उज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. राज्य सरकारने न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून पाप केलं, उज्वल निकम भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना त्यांना सरकारी वकील करून त्यांनी सिद्ध केलं की सरकारी वकीलही भाजपचे राहणार. पण भाजपच्या उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 


व्हिडीओ दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न...
दरम्यान, प्रसार माध्यमामधून माझ्याबद्दलचा एक व्हिडिओ दाखवून मला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे परंतु त्यात काही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं आहे. अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संत गजानन महाराजांची पालखी तेथे आली होती, मी वारकरी संप्रदायाचा असून गजानन महाराजांचे दर्शन घेण्यास गेलो असताना चिखलाने पाय माखले होते, एका कार्यकर्त्यांने पायावर पाणी टाकले आणि मी माझ्या हाताने माझे पाय धुतले, यात गैर काय आहे.


 मी शेतकरी माणूस आहे, मला चिखलाची सवय आहे, जे काही झाले ते दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात झाले आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही परंतु ज्या लोकांचे पाय ईडी कारवायात माखलेले आहेत, ते रात्रीच्या अंधारात ज्यांचे पाय धुतात, पाय चेपून देतात त्यांच्याबद्दल काही तरी बोलले पाहिजे, तेही दाखवले पाहिजे पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेल्या यशाने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत त्यामुळे अशा प्रकारे कारस्थाने करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण त्याचा काहीही फरक पडणार नाही असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.