मुंबई : देशासह राज्यात कोरोनानंतर (Corona) आता कुठे सर्व काही पूर्वपदावर येत होतं. सर्व काही नियमित झालं होतं. तेवढ्यात जुन्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे.  दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या  व्हेरिएंटच्या (Covid 19 New Variant) पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही (Maharashtra Government) सावध भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने खबरदारी म्हणून पुन्हा काही निर्बंध लावले आहेत. सरकारने या संदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. (Maharashtra state government has issued new guidelines for a new variant of  corona found in South Africa)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नियमावलीत?


आरोग्य विभागाच्या नियमावलीनुसार आता लसवंतानाच म्हणजे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यानाच रेल्वे प्रमाणेच बससेवा, रिक्षाने प्रवास करण्याची मुभा असणार आहे. नियमांचं भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रिक्षा आणि टॅक्सीत विनामास्क आढळल्यास प्रवाशासह ड्रायव्हरलाही 500 रुपये दंड द्यावा लागेल.  



तसेच दुकानात ग्राहक विनामास्क सापडल्यास 500 रुपये दंड द्यावा लागेल. तर त्या दुकान मालकाला 10 हजार दंड द्यावा लागेल. तर मॉलमध्ये ग्राहकाने मास्क न घातल्यास त्याचा भुर्दंड हा मालकाला सोसावा लागणार आहे. मालकाला थेट 50 हजार रुपये द्यावे लागतील. 


राजकीय सभा आणि कार्यक्रमांचं काय?


आरोग्य विभागाने या नियमावलीतून राजकीय पक्षांनाही सवलत दिलेली नाही. या राजकीय कार्यक्रमांनाही निर्बंध लादले आहेत. कार्यक्रम आणि सभांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्यास आयोजकांवर 50 हजार रुपये दंड आकारला जाईल. इतकच नाही, तर कार्यक्रम सुरु ठेवायचा की तिथेच बंद करायचे आदेश द्यायचे याचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला असणार आहेत.  


मुंबईत न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीचं काय?


न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलं आहे. या सामन्यालाही या नव्या व्हेरिएंटचा फटका बसला आहे. 


मुंबईत सामना होत असल्याने अनेक मुंबईकर क्रिकेट चाहते हा सामना पाहायला जाणार होते. मात्र सरकारने या सामन्याला केवळ 25 टक्के प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.


दरम्यान शासनाकडून नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करावं, असं आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनीही हा धोका टाळण्यासाठी सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करावं.