लपून-छपून का, महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे! - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र विकासआघाडी सरकारवर पहिल्या दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विकासआघाडी सरकारवर पहिल्या दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. आपला आक्रमकपणा काय ठेवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय करण्याचा धडाकाच लावला. त्यानंतर टीका केली. महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे, अशी टीका केली. आता दुसऱ्या दिवशीही फडणवीस यांनी टीका केली आहे. सगळे लपून-छपून का करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाराष्ट्र विकासआघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे. या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का घेतला आहे. नियमबाह्य पद्धतीने हंगामी अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी, असे विचारत स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का?, अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी, तसेच महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
दरम्यान, निवडणुकीच्या आधी राज्यात विरोधी पक्षच अस्तित्वाला राहणार नाही. दुसरा विरोधी पक्ष उदयाला येईल. तो असेल प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन विकासआघाडी. हाच पक्ष राज्यात विरोधी पक्ष असेल असे म्हटले होते. मात्र, निवडणूक निकालानंतर सगळे उलटेच झाले. शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटली. त्यानंतर महाराष्ट्र विकासआघाडी स्थापन करत राज्यात ठाकरे सरकार आले. आता भाजपवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड झाली आहे.