गणेश कवडे, झी 24 तास, मुंबई : चोरटे चोरी करण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. या चोरट्यांनी चोरी करण्यासाठी नवा फंडा शोधून काढला आणि त्यानुसार चोरी करायचे. हे झोलर स्पायडर मॅनसारखे भिंतीवरुन लटकायचे, ग्रील कापायचे आणि घरातील पैसे, दागदागिने आणि मिळेल ते चोरून सटकायचे.  मात्र या चोरट्यांना फार दिवस पोलिसांनी चकवा देता आला नाही. (malad police have arrested a thief like spider man and his accomplice)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर हे अट्टल चोर पोलिसांच्या हाती लागलेच. या दोघांना पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. अब्दुल इद्रिस शेख आणि मनोज जैन अशी या चोरट्यांची नावं आहेत.


नक्की प्रकरण काय? 


मालाडमधील 2 घरांमधून एकूम 15 लाख रुपयांची कॅश आणि 21 तोळं सोनं चोरीला गेल्याची तक्रार स्थानिक पोलीस स्थानकात देण्यात आली. मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या स्पायडरमॅन गँगचा छडा लावण्यासाठी एकूण 16 जणांची टीम तयार केली. या टीममध्ये तक्रार दाखल करण्यात आलेल्या मालाड पोलीस स्थानकातील पोलीस आणि गोराई पोलिसांचा समावेश होता.   


पोलिसांनी सर्व प्लॅन आखला. त्यानुसार सर्व तयारी केली. यातील अब्दुल हा राजस्थानला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ही 16 जणांची टीम राजस्थानला निघाली. या अब्दुलला राजस्थानमधून अटक केली. त्यानंतर त्याचा साथीदार असलेला मनोजच्याही मुसक्या आवळल्या. 


चोरलेल्या 21 तोळं सोन्याचं काय?


आरोपीने चोरलेले 21 तोळे सोने हे सोनार असलेल्या मनोज जैनला दाखवले. मनोजने हे सोनं नकली असल्याचं सांगितलं. त्यामुळे आरोपीने ते चोरलेले 21 तोळं सोने हे पाऊचसह नजीकच्या नाल्यात टाकून दिले. ही सर्व माहिती आरोपीने चौकशी दरम्यान पोलिसांनी दिली. पोलीसांनी त्या माहितीनुसार, दागिन्यांनी भरलेला पाऊच शोधून काढला. दरम्यान या सर्व प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.