मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात ऐरणवीर आलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा. त्यामुळे राज्यभर निघणारे मराठा समाजाचे मोर्चे आणि आजवर लाखोंच्या संख्यने प्रचंड शिस्त आणि शांततेत निघणाऱ्या या मोर्चाला लागलेले अचानाक हिंसक वळण. यामुळे सरकारदरबारीही खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमिवर अनेक बैठका घेतल्या जात आहेत. समाजमन ओळखून चाल खेळण्यात पटाईत अससलेले अनेक राजकीय नेतेही त्यामुळे बिथरले आहेत. ते वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत.  या नेत्यांमध्ये विरोधकही आहेत तसेच, मंत्री आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचाही समावेशा आहे. या विधानांमुळे कधी सरकारची कोंडी होत आहे तर, कधी विरोधकांना बळ मिळत आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारची चांगलीच गोची केली आहे. दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडून भाजपचा सत्तेत सहभागी असलेला मित्रपक्ष शिवसेनेने देवेंद्र फडणवीस आणि पर्यायाने सरकारवर टीका केली आहे.


पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांनी काय केले विधान?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तर ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते’, असे विधान केले होते. तर, ‘मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात’, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपरोधीक टीका केली आहे. पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामनामध्ये लिहिलेल्या लेखात ठाकरे यांनी सरकारला चांगचेच चिमटे काढले आहेत.


 फायलीचा लाल दोरा सोडावा


 'पंकजा की देवेंद्र… फाईल कोठे आहे?' या मथळ्याखाली लिलिहेल्या लेखात उद्धव ठाकरे उपरोधाने म्हणतात, ‘'मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात’, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगत असतात. ते खरे असेलही. कारण मराठा क्रांतीने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील! म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी फाईल कोठे आहे हे शोधून आता तरी फायलीचा लाल दोरा सोडावा व मराठा समाजाची मागणी पुढे न्यावी!'


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरू मुख्यमंत्री एकाकी?


दरम्यान, लेखामध्ये ठाकरे पुढे म्हणतात, 'पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे, नुसते सांगितले नाही तर शिवरायांची शपथ घेऊन सांगितले आहे की, ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.’ याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारात चालढकल केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय? असा प्रश्न पडतो. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये? असाही प्रश्न आंदोलकांना आता पडला असेल. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात व असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर सौ. पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे व तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे. पंकजाताईंची भूमिका समजून घेतली पाहिजे. त्या जे बोलत आहेत त्यात राजकारण आहे असे कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.