मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात पुढे काय करायचे याची दिशा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारमधून मुंबईत आल्यानंतरच ठरवली जाईल, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. आज यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

... म्हणून मी मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही; महाधिवक्ता कुंभकोणींचा गौप्यस्फोट



विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारला गेले आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. १५ तारखेला ते मुंबईत येतील. त्यानंतर फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे चव्हाणांनी सांगितले. 


राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप


तत्पूर्वी आजच्या बैठकीत मराठा आरक्षण कायद्यास दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे राज्यातील विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश यांच्यासह, भरती प्रक्रिया यांच्या अनुषंगाने झालेल्या परिणामाबाबत विस्ताराने आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे आणि उमेदवारांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.