... म्हणून मी मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही; महाधिवक्ता कुंभकोणींचा गौप्यस्फोट

महाधिवक्ता म्हणून या प्रकरणात युक्तिवाद करणे त्यांचे कर्तव्य होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. 

Updated: Sep 13, 2020, 07:12 PM IST
... म्हणून मी मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही; महाधिवक्ता कुंभकोणींचा गौप्यस्फोट title=

मुंबई: भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या आग्रही मागणीमुळेच मी आतापर्यंत मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही, असा गौप्यस्फोट राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा खटला नुकताच घटनापीठाकडे वर्ग केला होता. मात्र, यावेळी न्यायालयाने राज्यातील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने यावरून राजकारण तापले आहे. 

मराठा आरक्षणाच्या बाबतीत न्यायालयात कुठेही कमी पडलेलो नाही - मुख्यमंत्री

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे माजी वकील निशांत कटनेश्वरकर यांनी आशुतोष कुंभकोणी यांच्यावर आरोप केले होते. महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे आरक्षणाच्या प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी एकदाही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात गेले नाहीत. महाधिवक्ता म्हणून या प्रकरणात युक्तिवाद करणे त्यांचे कर्तव्य होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे आजच्या निर्णयाला तेही जबाबदार असल्याचे निशांत कटनेश्वरकर यांनी म्हटले होते. 

राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

यावर आशुतोष कुंभकोणी यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना जानेवारी २०१९ मध्ये सोलापूर येथे मराठा संघटनांची बैठक झाली होती. त्यावेळी सरकारच्यावतीने माजी महाधिवक्ता व्ही. ए. थोरात यांना युक्तिवाद करण्याची परवनागी द्यावी, अशी मागणी मराठा संघटनांनी केली. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला तशी विनंती केली. या विनंतीला मा देऊन मी प्रत्यक्ष न्यायालयात युक्तिवाद केला नाही. मात्र, मराठा आरक्षणासाठी इतर सर्व गोष्टींची तयारी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे कुंभकोणी यांनी सांगितले.