राजे हे रयतेचे असतात, जात पात मानणारे नसतात - वडेट्टीवार
राजे हे रयतेचे असतात. जात पात मानणारे नसतात असा टोला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही छत्रपतींना लगावला.
मुंबई : राजे हे रयतेचे असतात. जात पात मानणारे नसतात असा टोला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही छत्रपतींना लगावलाय. राजांची भूमिका महाराष्ट्र नजरेसमोर ठेवून असायला पाहिजे. शाहू महाराजांनी देशाला आरक्षण मार्ग मोकळा करून दिला, त्या विचारातून राजे घडले आहेत असेही सांगायला वडेट्टीवार विसरले नाहीत.
राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?, असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता संभाजीराजे छत्रपतींना विचारला आहे. शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले; मग हे राजकारण कशासाठी, असा प्रश्न यावेळी विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. एका समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये. ओबीसीविरोधात, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलचे तापले आहे. MPSC परीक्षा तात्काळ रद्द करावी, असी मागणी मराठा संघटनाकडूव करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात येत आहे. या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. यावेळी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. खासदार संभाजीराजे यांच्या या वक्तव्याला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, सरकारने मराठा समाजाची परीक्षा पाहू नये, उद्रेक झाला तर सरकारच जबाबदार राहील असा इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी दिलाय. ११ ऑक्टोबरला होणारी एमपीएससीची परीक्षा अन्यायकारक आहे, कोविडच्या संकटात आणि आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर परीक्षेची घाई का असा सवाल त्यांनी केलाय. सरकारने एमपीएससीच्या परीक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात अशी मागणी त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये केली.