शिवाजी पार्कवरील `पिक्चर`चा ठाण्यात `क्लायमॅक्स`? राज ठाकरे देणार `करारा जवाब`?
ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या (raj thackeray) जाहीर सभेकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.
ठाणे : मंगळवारी ठाण्यात पुन्हा राजगर्जना होणार आहे. गुढीपाडव्याच्या शिवाजी पार्कवरील सभेनंतर राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर जोरदार टीका झाली होती. विरोधकांच्या या सगळ्या आक्षेपांना उद्याच्या सभेत राज ठाकरे काय प्रत्युत्तर देणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचलीय आहे. (mns chief raj thackeray will hold a public meeting on tuesday april 12 in thane)
ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या जाहीर सभेकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवाजी पार्कवरील मेळाव्यात राज ठाकरेंनी मनसेचा नवा पिक्चर रिलीज केला. आक्रमक हिंदुत्वाची शाल पांघरत मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध आवाज उठवला. मशिदीसमोर भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला.
या वक्तव्यानंतर राज ठाकरेंवर टीकेची जोरदार झोड उठली. गेल्या लोकसभा निवडणुकीआधी लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे अचानक लाव रे हनुमानचालिसा का म्हणू लागले, असा तिखट सवाल विरोधकांनी केला.
मनसे ही भाजपची टीम बी असल्याचा टीकेचा भोंगा सुरू झाला. भाजपचा बनावट हिंदूहृदयसम्राट अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही समाचार घेतला
या टीकेच्या भोंग्याला उत्तर देण्यासाठीच ठाण्यातली सभा होत असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलंय. तसा ट्रेलरही दाखवण्यात आलाय.
शिवाजी पार्कवरील भाषणात राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारलाच टार्गेट केलं होतं. केंद्रातील भाजप सरकारबद्दल शब्दही उच्चारला नव्हता. आता उद्याच्या सभेत तोच कित्ता राज ठाकरे पुढं गिरवणार असल्याचं त्यांच्या सभेच्या ट्रेलरवरून तरी दिसतंय. फक्त विरोधकांच्या आरोपांना ते कसं उत्तर देणार याबाबत राज्याला उत्सुकता लागलीय.