ज्यांनी बाळासाहेबांच्या तत्वांशी तडजोड केली त्यांनी आम्हाला शिकवू नये - मनसे
मनसेचं संजय राऊतांना उत्तर
मुंबई : राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांना मनसेनं उत्तर दिलं आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, आधी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर मनसेकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांचा फोटो ट्विट करुन यावर उत्तर दिलं आहे. झी 24 तास सोबत बोलताना त्यांनी संजय राऊतांवर टीका देखील केली.
महाराष्ट्राच्या मान अपमानाच्या गोष्टी संजय राऊत यांच्याकडून शिकण्या सारख्या नाहीत. ज्या पक्षाने उत्तर भारतीय दिन साजरे केले, लाही चणा कार्यक्रम केले, ज्यांचा पक्ष भय्या लोकांच्या मांडीवर बसला, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांशी तडजोड केली त्यांनी आम्हाला शिकवू नये. अशी टीका संदिप देशपांडे यांनी केली आहे.
'राज्यपालांच्या समोर लोटांगण घालतानाचा संजय राऊत यांचा फोटो आहे त्यावर त्यांनी आधी बोलाव आणि मग दुसऱ्यांना सल्ले द्यावे. राज ठाकरे याबद्दल निर्णय घेतील, बोलतील पण शिवसेनेने आमच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास, राज ठाकरे यांचा केलेला छळ, चोरलेले नगरसेवक आम्ही कधीही विसरणार नाही. असं देखील देशपांडे यांनी यावेळी म्हटलं आहे.