MNS Padwa Melava Raj Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या दसरा मेळाव्यामध्ये (MNS Padwa Melava) आपले चुलत बंधू उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. राज ठाकरेंनी शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतर शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण पक्षचिन्हं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाकडे गेल्यासंदर्भात पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं. विशेष म्हणजे राज यांनी शिवसेनेबद्दलच्या आठवणी सांगताना बाळासाहेबांचा उल्लेख करत एकाच वाक्यात शिंदे आणि ठाकरे दोघांनाही टोला लगावला. तसेच राज यांनी शिवसेना हा पक्ष नेमका का सोडला याबद्दलही भाष्य केलं.


तेव्हा मला वेदना होत होत्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं? माझं का तुझं असं चालू होतं तेव्हा वेदना होत होत्या. इतकी वर्ष लहानपणापासून हा पक्ष पाहत आलो. पाहत काय आलो काय मी तो पक्ष जगलो. मला आजही आठवतंय की दुसरीत असताना माझ्या शर्टावर खिशाजवळ तो वाघ असायचा. तो ही बरोबर हृदयाच्या बाजूला. राजकारण लहानपणापासून पाहत आलो. बाळासाहेबांबरोबर राजकारण अनुभवत आलो. असंख्य लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली, लोकांच्या घामातून उभा राहिलेला तो पक्ष, ती संघटना आहे," असं राज ठाकरेंनी शिवसेनेसंदर्भातील भावना व्यक्त करताना म्हटलं. 


...म्हणून मी शिवसेनेतून बाहेर पडलो


"मी त्या पक्षातून बाहेर पडलो त्यानंतर इथेच (शिवाजी पार्कमध्ये) माझं भाषण झालं होतं. तेव्हा मी म्हटलेलं माझा वाद हा विठ्ठालाशी नाही तर विठ्ठलाच्या आजूबाजूंच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हे ही म्हटलं होतं की, हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार. हा पक्ष खड्ड्यात घातल्यानंतर त्यात वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून मी बाहेर पडत आहे," अशी आपल्याच वक्तव्यांची आठवण राज यांनी मनसैनिकांना करुन दिली.


ते सगळं खोटं होतं


आज हे सगळं राजकारण, आजची झालेली परिस्थिती पाहिल्यावर. 2006 ला पक्ष स्थापन केला त्या संपूर्ण भाषणात काय झालं कशामुळे झालं तो सगळा चिखल मला करायचा नव्हता. पण काही गोष्टी ज्या पसरवल्या गेल्या ज्यामध्ये राज ठाकरेला शिवसेनाप्रमुख पद पाहिजे होतं. संपूर्ण पक्ष त्याला आपल्या हातात पाहिजे होता असं सांगितलं गेलं ते सगळं खोटं आहे, असंही राज म्हणाले.


एकाच वाक्यात शिंदे-ठाकरेंना टोला


पुढे बोलताना राज ठाकरेंनी एकाच वाक्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री तसेच बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंना टोला लगावला. "(त्यावेळी) माझ्या स्वप्नात कधी आलं नाही (की संपूर्ण शिवसेना पक्ष आपल्या हातात पाहिजे), मनाला कधी (असल्या विचारांनी) शिवलंही नाही. तो नुसता पक्ष नव्हता शिवधनुष्य होतं. मला माहिती होतं की ते बाळासाहेबांना सोडून कोणालाही ते पेलणार नाही आणि झेपणार नाही. एकाला झेपलं नाही, माहित नाही दुसऱ्याला झेपेल की नाही," असं सूचक विधान राज यांनी आपल्या भाषणादरम्यान केलं.