MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच रोजगाराच्या मुद्द्यावर भाष्य करत असतात. मराठी भाषेसह मराठी मुलांना रोजगार मिळावा यासाठी राज ठाकरे सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रोजगाराच्या प्रश्नाबाबत राज ठाकरे यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. आता राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीबाबत सोशल मीडियावर महत्त्वाची पोस्ट केली आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयातील भरतीबाबत राज ठाकरेंनी पोस्ट करत मनसे पदाधिकाऱ्यांनाही महत्त्वाचे आदेश दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे भरतीत मराठी मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2008 मध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोनलानंतर राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. या आंदोलनामुळे रेल्वे भरती परीक्षेच्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रांमध्ये येऊ लागल्या आणि परीक्षाही स्थानिक भाषेत घेण्यात आल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी रेल्वेतल्या भरतीबाबत महत्त्वाची पोस्ट केली आहे.


"भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या 5696 जागा आहेत. 18 ते 30 वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच बघा वेबसाईट असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे," असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.



हिंदी राष्ट्रभाषा नाही - राज ठाकरे


रविवारी नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रातल्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नसल्याचे म्हटलं आहे. "मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावर संस्कारच त्या प्रकारचे झाले. महाराष्ट्रात मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेत सुरु होत आहे हे काही कमी आहे का. आपण आधी महाराष्ट्रामध्ये लक्ष देणे गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या शहरांमध्ये मराठी सोडून हिंदी कानावर यायला लागते त्यावेळी त्रास व्हायला लागतो. हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे. जशा इतर भाषा आहेत तशा इतर भाषा आहेत. राष्ट्रभाषा म्हणून कुठलीही भाषा नेमली नाही. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संवाद साधण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी भाषा ठेवली. हे जेव्हा पहिल्यांदा बोललो तेव्हा अनेक लोक माझ्या अंगावर आले. तेव्हा मी गुजरात हायकोर्टाचा कागद समोर ठेवला. भाषा उत्तम असली तरी हिंदी राष्ट्रभाषा नाही," असे राज ठाकरे यांनी म्हटलं.