मुंबई : केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचं आगमन झालं आहे. जोरदार पावसाच्या सरींना सुरुवात झाली असून वातावरण अल्हाददायक झालं आहे. आता महाराष्ट्रातील आगमनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यात १०२ टक्के पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत असल्यामुळे किनारी भागात पावसाची जोरदार हजेरी असेल. यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह आसपासच्या भागात सोमवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मुंबईसह, उपनगर, ठाणे, पालघरमध्येही काही भागात पाऊस झाला. हवामान विभागाने (IMD)अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र, चक्रीवादळाच्या रुपात बदलू शकत असल्याचं अंदाज वर्तवला आहे. 3 जून रोजी उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्ट्यांवर हे वादळ आदळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 3 जून आणि 4 जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढच्या 12 तासात पूर्वपश्चिम आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यानंतरच्या 24 तासात पूर्वोत्तर अरबी समुद्रावरील चक्री वादळाची शक्यता आहे. 


3 आणि 4 जूनला उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस असेल, असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं. 




कोल्हापूर, लातूर, रत्नागिरी आणि मुबंईतही पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह काळेभोर ढग दाटून आल्यामुळे पावसासाठीचं पूरक वातावरण पाहायला मिळत आहे. मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात झाल्यामुळे बळीराजाच्या हातालाही काम मिळालं आहे.