Monsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather Updates : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
Maharashtra Weather Updates : विदर्भ आणि मराठवाड्यात धडकणाऱ्या अवकाळी पावसानं (Konkan and Mumbai) कोकण आणि मुंबईचीसुद्धा वेस ओलांडली आणि अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली. सोमवारी सकाळपासून ज्या मुंबई आणि उपनगरांमध्ये उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले होते त्याच भागामध्ये दुपारनंतर मात्र हवामानात अचानक बदल होण्यास सुरुवात झाली आणि शहरातील काही भागांना अवकाळी पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी मोठाले वृक्ष, होर्डिंग पडल्याच्या दुर्घटना घडल्या. दरम्यान हे सर्व सुरु असताना मान्सूनची सुरुवात झाल्याचा अनेकांचाच समज झाला पण, प्रत्यक्षात तसं नाहीय.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा अशी एकंदर स्थिती पाहायला मिळेल. इथं ताशी 50-60 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांत आकाश अंशत: ढगाळ राहील. तर, रात्रीच्या वेळी हलका पाऊस होईल, काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटाचीही शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली
आयएमडी (IMD) आणि स्कायमेटनं (Skymet) वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी मान्सून 8 जूनपर्यंत देशात दाखल होईल असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र हवामानाची एकंदर स्थिती आणि वाऱ्यांची रचना पाहता हे मोसमी वारे अधिक प्रभावी दिसत असून, 19 मे च्या जवळपास देशात (Monsoon) मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या (Andaman and Nicobar) दक्षिणेकडे मान्सून दाखल यादरम्यान दाखल होणार असून, त्यानंतर त्याचा केरळ रोखानं प्रवास सुरु होईल. राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानातील बदल पाहता देशात आणि राज्यातही अपेक्षित तारखेआधीच मान्सून धडकल्यास आश्चर्य वाटू नये. हो, पण नुकताच झालेला पाऊस हा मान्सूनचा पाऊस नसून तो अवकाळी पाऊस असल्याचीही नोंद घ्यावी.
हेसुद्धा वाचा : खबरदारी घ्या! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा उसळणार, पुराचीही शक्यता... मान्सूनचा चिंता वाढवणारा अंदाज
मान्सून आला कसं ओळखावं?
हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागामध्ये वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण होऊन हे वारे उत्तरेच्या दिशेनं पुढे जातात. पृथ्वीच्या परिभ्रमण क्रियेमुळं हेच वारे मान्सूनच्या दिशेनं मार्गी लागतात आणि अंदमान भागात दाखल होतात. तिथं या वाऱ्यांमुळं ढग तयार होऊन पावसाला सुरुवात होते. अंदमानमध्ये साधारण 24 तासांसाठी हा पाऊस झाल्यावर मान्सून देशात दाखल झाला असं ओळखलं जातं.