खबरदारी घ्या! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा उसळणार, पुराचीही शक्यता... मान्सूनचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashtra Weather News : हवामान विभागाकडून सातत्यानं देशातील आणि महाराष्ट्रातील हवामानासंदर्भातील आढावा घेत महत्त्वाचे संकेत देण्यात येत आहेत.   

सायली पाटील | Updated: May 13, 2024, 02:46 PM IST
खबरदारी घ्या! नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, समुद्रात उंच लाटा उसळणार, पुराचीही शक्यता... मान्सूनचा चिंता वाढवणारा अंदाज title=
weather updates Monsoon in india el nina and la nino news

Monsoon News : काही दिवसांपूर्वीच भारतीय हवामानशास्त्र विभागानं देशात यंदाच्या वर्षी मान्सूनचं प्रमाण नेमकं किती राहील याचा अंदाज देणारं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं. ज्यामध्ये 2024 मध्ये देशात सरासरीहून अधिक पर्जन्यमानाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 8 जूनपर्यंत भारताच्या वेशीवर मान्सून दाखल होणार असून, 5 जून ते 30 सप्टेंबरच्या काळात तो संपूर्ण देश व्यापणार आहे. एकंदरच यंदाच्या वर्षी भारतातील मान्सूनसाठी बहुतांशी पूरक वातावरण पाहायला मिळत आहे. 

अमेरिकेतील राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार लवकरच अल नीना प्रणाली सक्रिय होणार असून, पॅसिफिक समुद्रात त्याचे परिणाम दिसू लागणार आहेत. ज्यामुळं जून महिन्यात सरासरीहून अधिक पर्जन्यमान राहील. पॅसिफिक महासागरात दिसणाऱ्या अल नीना प्रणालीचे परिणाम जून महिन्यापासून अधिक तीव्र होताना दिसतील. 

National Oceanic and Atmospheric Administration of the US नं नुकतीच एक आकडेवारी जारी करत जूनपासून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत अल नीनाचा प्रभाव कायम राहणार आहे. ज्यामुळं देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार असून, पूरसदृश्य परिस्थिती उदभवणार आहे. मान्सूनदरम्यान अल नीनाचा प्रभाव कायम असल्यामुळं नद्याही धोक्याची पातळी ओलांडून वाहण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. 

अल नीना म्हणजे नेमकं काय? 

भारतामध्ये 2023 या वर्षामध्ये सक्रिय अल नीनो ही स्थिती सक्रिय होती. या हवामानाच्या स्थितीमध्ये उष्णतेचं प्रमाण अधिक राहिल्यानं मान्सून कमकुवत ठरला होता. तर, अल नीना या प्रणालीमध्ये मात्र याउलट गोष्टी घडताना दिसतात. अल नीनामध्ये पाऊस आणि थंडीचं प्रमाण अपेक्षेहून अधिक असतं. फक्त अमेरिकेतील संस्थाच नव्हे, तर यंदा भारतीय हवामान विभागाकडूनही अल नीना सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरल 

गेल्या काही महिन्यांपासून अल नीनाशी संबंधित हवामान बदल झाल्याचं पाहायला मिळाल्याचं वृत्त NOAA नं प्रसिद्ध केलं. भारतात  ही प्रणाली जून महिन्यापासून सक्रिय होण्याचे संकेत असून, जून ते ऑगस्टदरम्यान त्याचा परिणाम 49 टक्के आणि जुलै ते सप्टेंबरदरम्यान त्याचा परिणाम 69 टक्के इतका असेल. 

काही दिवसांमध्येत भारताच्या वेशीवर धडकणाऱ्या आणि पाहता पाहता संपूर्ण देश व्यापणाऱ्या या मान्सूनच्या काळात अल नीनाच्या प्रभावामुळं पर्जन्यमान अधिक राहणार आहे. बहुतांशी याचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यंना होताना दिसेल. पण, पावसाचं प्रमाण वाढल्यास मात्र काळजी घेण्यासाठीही सज्ज व्हावं लागेल हे नाकारता येत नाही.