अमृता फडणवीसांना धमकी देणारी ती` फॅशन डिझायनर अखेर पोलिसांच्या ताब्यात; काय आहे नेमकं प्रकरण?
Amruta Fadnavis Bribe Case: फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षा नावाच्या महिलेने अमृता फडणवीस यांच्यासोबत जवळीक साधली होती. त्यानंतर विश्वास संपादन करुन अनिक्षाने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याविरोधात कट रचला आणि धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
Amruta Fadnavis 1cr Bribe Threatening Case: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Davendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर डिझायनर असलेल्या अनिक्षा नावाच्या महिलेविरोधात आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवेंद्र फडणीस यांनी याबाबत विधानसभेत याबाबत या कहाणीचा खुलासा केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता अनिक्षा नावाच्या महिलेला मलबार हिल पोलिसांनी (Mumbai Police) उल्हासनगर (Ulhasnagar) येथून ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली आहे
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या प्रकरणाबाबत प्रश्न मागताच देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले. देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीनंतर मलबार हिल पोलिसांचे पथक उल्हासनगरमध्ये दाखल झाले होते. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल जयसिंघानिया नावाच्या व्यक्तीचे नाव घेतले होते. पोलिसांनी अनिल जयसिंघानिया यांच्या घरी पोहोचत त्यांच्या घराची झाडाझडती सुरु केली. यानंतर पोलिसांनी अनिक्षाला ताब्यात घेतले. मलबार हिल पोलिसांनी उल्हासनगर मध्ये दाखल होताच विविध ठिकाणी झाडाझडती सुरु केली आहे. पोलिसांनी जयसिंघानीयांच्या कुटुंबीयांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
दोन महिन्यांपूर्वी अमृता फडणवीस यांनी एका डिझानयर विरोधात तक्रार दाखल केली होती. धमकी आणि कट रचल्याचा आरोपाखाली करत अमृता फडणवीस यांनी अनिक्षा नावाच्या महिलेविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे. त्यानंतर विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस या प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा केले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला घटनाक्रम
"सात ते आठ वर्षे फरार असलेल्या अनिल जयसिंघांनी नावाच्या व्यक्तीची गमुलगी 2015 ते 2016 दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटत होती. त्यानंतर भेटणे बंद झाले आणि अचानक या मुलीने अमृता फडणवीस यांना पुन्हा भेटणे सुरु केले. त्यावेळी या मुलीने मी डिझायनर असल्याचे सांगितले. विश्वास संपादित केल्यानंतर त्या मुलीने सांगितले की माझ्या वडिलांना एका प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सोडवा. माझ्या पत्नीने याबाबत निवेदन देण्यास सांगितले. सरकार बदलल्यानंतर तिने पुन्हा माझ्या वडिलांना फसवल्याबद्दल सांगितले. काही दिवसांनी मुलीने सांगितले की माझे वडील सगळ्या बुकीजना ओळखतात. मागच्या काळामध्ये आम्ही माहिती द्यायचो आणि त्यानंतर छापे पडायचे. त्या छाप्यामध्ये आम्हाला दोन्ही बाजूने पैसे मिळायचे. तुम्ही थोडी मदत केली तर आपणही असे छापे मारु शकतो," अशी धक्कादायक माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
"माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देते असेही या महिलेने सांगितले होते. यानंतर एका अनोळखी क्रमांकावरुन काही व्हिडीओ आणि क्लिप आल्या. त्यामध्ये तिने अमृता फडणवीस यांचे संभाषण रेकॉर्ड केले होते. यातल्या एका व्हिडीओमध्ये ही मुलगी एका बॅगेत पैसे भरताना दिसत होती. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तशीच बॅग ती मुलगी आमच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला देण्यात आल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर धमक्या देण्यात आल्या की हे व्हिडीओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी धोक्यात येईल. माझे सगळ्या पक्षांसोबत संबंध आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा," अशी धमकी दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.