मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुढचे 24 तास महत्त्वाचे... मिठी नदी धोक्याच्या पातळीवर
Mumbai Weather Update: पुढील 24 तासात मुंबईसह काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतल्या मिठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Mumbai Weather Update: बातमी मुंबईकरांची चिंता वाढवणारी. पुढचे 24 तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील 24 तासात हवामान खात्याकडून (Department of Meteorology) मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतील काही भागात अत्याधिक मुसळधार पाऊसही कोसळू शकतो असाही अंदाज हवामान खात्याकडून हा वर्तवण्यात आलाय. मुंबई शहर आणि उपनगरांत या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग 60 ते 70 किलोमीटर एवढा असू शकतो. भरतीच्या कालावधीत जर पाऊस झाल्यास मुंबईत (Mumbai) मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.. मुंबईसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर
मुंबईतली मिठी नदी (Mithi River) धोकादायक पातळीच्या जवळ पोचलीय. मिठी नदीची धोकादायक पातळी 2.7 मीटर आहे..तर मिठी नदीने सध्या 2.6 मीटरची पातळी गाठली आहे.. त्यामुळे कुर्लाजवळच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी माईकवर घोषणा करत इशारा देत आहेत. पालिकेच्यावतीने कुर्ल्यातील मिठी नदी परिसरातील नागिरकांचं स्थलांतर काम करण्याचं काम सुरु आहे. मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. कुर्ला परिसरातील मिठी नदी परिसरातील नागरिकांना हलवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. पण नागरिकांनी घरं सोडण्यास नकार दिला आहे.
कल्याणमध्ये अतिमुसळधार
मुंबईनजीक असलेल्या कल्याणमधील उल्हास नदीने मुसळधार पावसामुळे इशारा पातळी ओलांडलीय. यामुळे तहसील प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय.दरम्यान कल्याण नगर महामार्गावरील रायते पुलावर देखील पाणी वाहण्याची शक्यता असल्यामुळे, सुरक्षिततेसाठी या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलीय. तर वाहन चालकांना टिटवाळा गोवेली मार्गे कल्याण गाठण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलंय.
पुण्यात पूरपरिस्थिती
पुण्यात आज पावसानं हाहाकार केलाय. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय. पुणे जिल्ह्यात बचावकार्यासाठी NDRFच्या 3 टीम तैनात करण्यात आल्यायत. एकता नगर परिसरातील सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेलेत. नागरिकांच्या छातीपर्यंत याठिकाणी पाणी आहे. पुणे एकता नगरमध्ये बोटीद्वारे बचावकार्य सुरुय. पुण्यातल्या विठ्ठलवाडी परिसरातही पाणी साचल्यामुळे नागरिकांचं बोटीद्वारे बचावकार्य करण्यात आलंय. मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालीय. सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीच पूर्व सूचना प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याचं सांगत पुणेकरांनी संताप व्यक्त केलाय. काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
सरकारचं आवाहन
पुण्यात अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. खडकवासला धरणाच्या वरच्या भागात 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यानं ही परिस्थीती निर्माण झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनीच फिल्डवर उतरण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी केलंय. सैन्यालाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आल असून गरज भासल्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एअर लिफ्टचीही तयारी करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलंय.
विरोधकांचा सरकारवर निशाणा
राज्यातील पूरस्थितीला नाना पटोलेंनी राज्य सरकारला जबाबदार धरलंय. पुणे, सांगली, गडचिरोलीमध्ये पूर आलाय. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक व्यवस्था बदलली. त्यामुळेच राज्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली, असा आरोप पटोले यांनी केलाय.