मुंबई : कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी मुंबईत विशेष लोकल सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र, सर्व सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरु नसल्याने अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असणाऱ्या लोकलमध्ये प्रवेश देण्यात यावा किंवा प्रवाशांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी करत नालासोपारा येथे संतप्त प्रवाशांनी लोकल रोखून धरली. अनेक प्रवासी रुळावर उतरले होते. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.



नालासोपारा रेल्वे स्थानक इथे सर्वसामान्य लोकांनी लोकलमधून प्रवास करता यावा यासाठी रुळावरुन उतरुन आंदोलन केले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अनेक प्रवासी स्थानकात जमा झाले होते. मात्र, त्यांना रेल्वेत घेण्यात आले नाही. त्यामुळे हे प्रवासी संतप्त झालेत. त्यांनी लोकल प्रवास करू द्यावा या मागणीसाठी रुळावर उतरुन केले आंदोलन. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी लोकल सेवा सुरु आहे. आमच्यासाठीही लोकल सेवा सुरु करा, अशी मागणी यावेळी प्रवाशांनी केली.