मुंबई : CORONAVIRUS देशभरात कोरोना विषाणूची नव्यानं बाधा होणाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढत असतानाच आता काही नव्या भागांमध्ये हा संसर्ग अधिक झपाट्यानं फैलावताना दिसत आहेत. या साऱ्यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे मायानगरी MUMBAI मुंबईमध्ये अतिशय वेगाने पसरलेला कोरोना आता अंशत: नियंत्रणात येत असल्याची चिन्हं आहेत. मंगळवारी हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत चोवीस तासांमध्ये ९९५ नवे कोरोनाबाधित आढळले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले काही दिवस सलग मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दर दिवशी हजारांच्या घरात वाढत होती. असं असतानाच एक हजारहूनही कमी रुग्णसंख्येचा आकडा या शहरानं पाहिला. या नव्या रुग्णांसह मुंबईतील एकूण कोरोऩाबाधितांचा आकडा १,०३,२६२ वर पोहोचला आहे. तर, कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांची संख्या ५८१४ वर पोहोचली आहे. 


मागील चोवीस तासांमध्ये मुंबईत कोरोनामुळं ६२ जणांचा मृत्यू झाला. ज्यापैकी ४६ रुग्णांना इतरही काही आजार असल्याचं निष्पन्न झालं. तर, ९०५ रुग्णांनी या विषाणूवर यशस्वीरित्या मात केल्याचं स्पष्ट झालं आहे. आतापर्यंच शहरात एकूण ७३,५५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, सद्यस्थितीला एकूण २३,८९३ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचार सुरु आहेत. 


एकंदरच मुंबईत काही दिवसांपूर्वी माजलेला कोरोनाचा हाहाकार आता काही अंशी नियंत्रणात येत असल्याची चिन्हं आहेत. वरळी कोळीवाडा, धारावी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणीही कोरोना नियंत्रणात आल्यामुळं आणि हॉटस्पॉट कमी झाल्यामुळं आता शहरात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. 


 


एकिकडे ही परिस्थिती असताना तिथं पुण्यात मात्र कोरोना हातपाय पसरताना दिसत आहे. मुंबई आणि ठाण्यापेक्षाही या भागात कोरोना अधिक झपाट्यानं फोफावत असल्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढं अनेक अडचणी येत आहेत. त्यावरही मात करत कोरोनाला आळा घालण्यासाठी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याटं पाहायला मिळत आहे.