Mumbai Metro Shutdown:  मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं नोकरदार वर्ग आणि इतरही अनेक नागरिक मुंबई मेट्रोनं प्रवास करताना दिसतात. (Mumbai Metro) मुंबई मेट्रोच्या उपलब्धतेमुळं शहरातील लोकल सेवेवरील काहीसा भार कमी झाला आहे, तर विविध ठिकाणी जाणं सुकर झालं आहे. पण, गुरुवारी मात्र मुंबईकरांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण, गुरुवारी मुंबई मेट्रो सेवा साधारण पावणेदोन तास बंद राहणार आहे. 


का बंद असेल मेट्रो सेवा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विविध विकासकामांच्या उदघाटनांसाठी 19 जानेवारी म्हणजेच गुरुवारी मुंबईत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 ला हिरवा कंदिल दाखवण्यात येईल. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईमध्ये जोरदार तयारीही सुरु आहे. याच दौऱ्यादरम्यान (BKC ) वांद्रे- कुर्ला संकुलामध्ये असणाऱ्या मैदानात त्यांची जाहीर सभाही होणार आहे. 


पंतप्रधानांच्या दौऱ्याची एकंदर रुपरेषा पाहता वर्सोवा- अंधेरी-घाटकोपर या मार्गांवरील मेट्रो सेवा यामुळं प्रभावित होणार आहे. ज्यामुळं ती सायंकाळी 5.45 ते 7.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो वनकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. 


मुंबईकरांच्या प्रवासात येणार व्यत्यय... 


मेट्रोमुळं मुंबईकरांचा प्रवास सुकर होतो आणि मुख्य म्हणजे विविध मार्गिकांवर सहजपणे पोहोचता येतं. पण, आता गुरुवारी ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळांमध्येच ही मेट्रो बंद असणार आहे. त्यामुळं नोकरदार वर्ग आणि मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रत्येतकानं वेळेचं नियोजन करुन निघावं. किंबहुना अशा प्रसंगी अनेकजण लोकलनंही प्रवास करण्याचा पर्याय निवडू शकतात. तुम्हीही याच विचारात असाल तर लोकलचं वेळापत्रक आताच पाहून घ्या. (Mumbai Local Timetable)


पंतप्रधानांच्या सभेला युवासेनेचा विरोध? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील दौऱ्यादरम्यान एका सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचं नियोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आलं आहे. पण, यासाठी युवासेनेनं विरोध केला आहे. विद्यापीठाला तीन प्रवेशद्वारं असतानाही वाहनं आत जाण्यासाठी भींत तोडून चौथं प्रवेशद्वार कशासाठी करण्यात येतंय असा सवाल युवासेनेनं विचारला आहे. 


हेसुद्धा वाचा : Weather Updates : राज्यात आणखी दिवस थंडीचा कडाका, या जिल्ह्यात 15 दिवसांपासून नीचांकी तापमान


 


मोदींच्या सभेसाठी साधारण पाच हजार वाहनं मुंबई विद्यापीठात लावण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. पण, या गाड्या लावल्यामुळं विद्यार्थ्यांना त्रास होईल असा दावा युवासेनेनं केला आहे. 


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याला अनुसरून पालिका प्रशासन आणि पोलिसांची बैठक नुकतीच पार पडली. या दौऱ्यादरम्यान आणि सभेसाठी येणाऱ्या व्हीआयपींची आरटीपीसीआर केली जाणार आहे. तसंच पोलिसांचं विशेष पथकही यावेळी कार्यरत असेल.