मुंबई: निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर आज सकाळपासून मुंबईत तुफान पाऊस कोसळत आहे. थोड्या थोड्या कालावधीनंतर पावसाच्या मुसळधार सरी शहरात बरसत आहे. अगदी थोड्या काळात वादळी पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपिट उडाली. मात्र, आगामी काळात मुंबईतील पावसाचे स्वरुप असे नसेल, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांकडून हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप, म्हणाले...


त्यांनी म्हटले की, आज सकाळपासून तसेच मुंबईत आज सकाळपासून ज्या तीव्रतेने पाऊस पडत आहे तसा पाऊस आगामी काळात पडणार नाही. आगामी महिन्यांत मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊसच पडेल.
याशिवाय, रायगड, ठाणे आणि नाशिकमध्ये फारसा पाऊस पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या महाराष्ट्रातील वाटचालीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला. मान्सून कारवारपर्यंत दाखल झालाय. चक्रीवादळाचा जास्त परिणाम त्याच्या वाटचालीवर झालेला नाही. तो उत्तरेकडे सरकत आहे. २-३ दिवसांत मान्सून तळकोकणाकडे वाटचाल करेल, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली. 


मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले


दरम्यान, आज सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. सकाळपासूनच मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची दाटी होती. कालपेक्षा मुंबईत आज पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर मुंबईभर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरातील घाटकोपर, कुर्ला, अंधेरी भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.