मुंबई : आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा घेणारी बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पार पडली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगले समन्वय ठेऊन काम करा तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असं मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, मान्सूनपूर्व कामे करण्यासंदर्भात मुंबईत बांधकामे सुरु असणाऱ्या संस्थांकडून विनंती करण्यात आल्या होत्या. १ हजारपेक्षा जास्त परवानग्या प्रलंबित होत्या . त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घेऊन मुंबईत  बांधकामांच्या ठिकाणी मान्सून पूर्व सुरक्षिततेसाठी, तसेच डेब्रिज काढणे वगैरेची कामे सुरु झाली आहे. मुंबईतील ४०० किमीचे नाले ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले असून तुंबणारे नाले स्वच्छ करण्यात येत आहेत.  (रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या - मुख्यमंत्री)


प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याने  रेकी करून त्यांच्या भागात गटारे व चेंबर्स उघडी नाहीत ना  याची खात्री करून घ्यायला सांगितले आहे. हिंदमाता, कलानगर, आणि इतर ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करणार असून उच्च क्षमतेचे पंप्स वापरून पाणी उपसणे शक्य केले आहे.  मुंबईत कुठेही अडचण येणार नाही असे आश्वस्त करून पालिका आयुक्त म्हणाले की, मुंबईत ३३६ पुराची ठिकाणे आहेत. मिठी नदीचे सफाईचे ७७% काम पूर्ण झाले आहे. 


३२४ पाणी उपसणारे पंप कार्यान्वित आहेत. पुराचे पाणी उपसा करण्यासाठी ६००० लिटर्स प्रती सेकंद पाणी उपसणारी यंत्रणा देखील सुरु आहे असे ते म्हणाले. कुर्ला, सायन येथे पाणी साचू नये म्हणून मोठ्या शक्तिशाली क्षमतेचे पंप बसवले आहेत. रस्त्यांची ६०९ कामे  १० जूनपर्यंत पूर्ण करणार असून ३२ पूल दुरुस्ती कामे सुरु आहेत. 


५६१ मृत झाडे पूर्णपणे तोडायची असून १,१७००० झाडांच्या फांद्या छाटण्यात येत आहेत असे सांगून ते म्हणाले की, २०१९ मध्ये पावसाळ्यातील विविध रोगांमुळे मुंबईत २० मृत्यू झाले होते. यात लेप्टो, डेंग्यू,स्वाईन फ्ल्यू  या रोगांचा समावेश होता. यंदा मे महिन्यापर्यंत गॅस्ट्रोमुळे १८०२, मलेरिया ५१९, हेपेटायसीस १८८, स्वाईन फ्ल्यू चे  ४२ असे रुग्ण आढळले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. 


मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्सूनपूर्व कामांची माहिती दिली.  गेल्या वर्षी कल्याण, सांगली, कोल्हापूर येथे नौदलाने अविरत काम करून अनेकांचा जीव वाचवला आमचे  दल मुंबई, पुणे, नागपूर याठिकाणी हेलीकॉप्टरने सज्ज आहे असे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले.. 


तटरक्षक  दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी ९ जहाजे तयार असून  ८ एअरक्राफ्ट देखील आहेत.याशिवाय, मेरीटाईम नियंत्रण कक्षाच्या मदतीने संकटाशी मुकाबला करण्यात येईल. 


राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफच्या  अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडे १८ टीम्स असून  (एका टीम मध्ये ४७ जवान असतात) मुंबई, नागपूर व पुण्यात त्या तैनात आहेत. बोटींची मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे रबरी बोटींचा आगाऊ साठा ठेवावा असेही ते म्हणाले. 


भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३९ कंपन्या या आम्ही तयार ठेवल्या आहेत सेन्ट्रल कमांडिंग सेंटर मधून आपत्तीच्या वेळी सुचना मिळाव्यात म्हणजे प्रत्यक्ष नियोजन करता येणे शक्य होईल अशी सुचना त्यांनी केली. माजी सैनिक यांचा लष्कर आणि प्रशासनात चांगले समन्वयक म्हणून काम करतील अशी सूचनाही त्यांनी केली.



मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क


मुंबईतील हवामान विभाग मुंबई पालिकेच्या समन्वयाने काम करीत आहोत. मुंबई तुंबते त्यासाठी पूर इशारा यंत्रणा विकसित केली आहे. प्रभाग पातळीवर किती पाउस पडून पाणी पातळी किती वाढू शकते याची वेळीच माहिती मिळते  . १४० पर्जन्यमापन केंद्रे सध्या असून शेतकऱ्यांसाठी मेघदूत मोबाईल एप आहे तसेच  उमंग मोबाईल एपवर देखील रिअल टाईम माहिती मिळू शकेल असे ते म्हणाले.