रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या - मुख्यमंत्री

आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक 

Updated: May 26, 2020, 03:23 PM IST
रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या - मुख्यमंत्री  title=

मुंबई : सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगले समन्वय ठेऊन काम करा तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ते आज आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेत होते. 

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही इतके आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे मात्र तरी देखील पाउस आपले अंदाज चुकवतोच. अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होणे, त्यामुळे वादळ, जोरदार पाउस, ढग फुटी असे काहीही होऊ शकते, त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहावे व चांगला समन्वय ठेवावा. 

ज्याप्रमाणे विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते त्याप्रमाणे रेल्वेने देखील पुढील मार्गातील हवामानाचा अंदाज पाहून  रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ अडकली होती त्याचा संदर्भ त्यांनी दिला. आपण आपत्तीत  बचाव कार्य करणार आहोत पण सध्या कोविड परिस्थितीमुळे सावधानता बाळगावी लागणार आहे. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने व किट्स. मास्क उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. 

गेल्या वर्षी प्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या 

कोणत्याही परिस्थितीत खड्डे नकोत 

मुंबईत २००५ च्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधानिशी काम करू लागलो. नाले सफाई, त्यांचे  खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणे हे महत्वाचे आहे. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे  तेथील पाईप्स मोकळे आहेत का ते पहायला पाहिजे. शहरी असो किंवा ग्रामीण भाग पण कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू न देणे आणि पडले तर तत्काळ बुजविणे महत्वाचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. दुर्गम भागात पावसाळ्यात अन्न धान्य, औषधी पूर्वाधा व्यवस्थित झालेला आहे का हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 

विभागवार, जिल्हावार बैठका घेऊन व त्यात सबंधित डॉक्टर्सना सहभागी करून घेऊन पावसाळ्यातील रोगांसत्यही चांगले नियोजन करण्यास त्यांनी सांगितले. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात कोविडसाठी विलगीकरण सुविधा केल्याने एनडीआरएफला पर्यायी जागा लगेच द्या असे निर्देश त्यांनी दिले. स्थानिक पातळीवर माजी सैनिकांना सहभागी करून घेतल्यास भारतीय लष्कर आणि प्रशासनात चांगला समन्वय राहील असेही ते म्हणाले. 

मेघदूत आणि उमंग मोबाईल एप

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक के एल होसाळीकर यांनी यावेळी सादरीकरण करून सांगितले की राज्यात पाउस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल.  १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाउस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पडणार नाही. ज्यामुळे गेल्या वर्षी उत्तरार्धात भरपूर पाउस झाला तो इंडियन ओशन डायपोल देखील अनुकूल आहे.  मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाउस होईल. सर्वसाधारणरित्या महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल आणि  नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून  ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरु होईल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के पेक्षा जास्त पाउस झाला होता असे ते म्हणाले.