Mumbai Atal Setu News : 2024 या वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं लोकार्पण पार पडलं आणि या नव्या मार्गामुळं मुंबई शहर- नवी मुंबईमधील अंतर मोठ्या फरकानं कमी झालं. अटल सेतू सुरुवातीपासूनच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला होता. अशा या ट्रान्स हार्बर लिंकवर काही दिवसांपूर्वीच एक खळबळजनक घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटल सेतूवर टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या मुंबईतीलच एका महिलेनं टॅक्सी थांबवत पूलावरून उडी मारत आत्महत्या केली. अशा कोणत्याही प्रकारची घटना घडू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी सुरक्षेसाठीच्या जाळ्याही लावण्यात आल्या असतानाही ही धक्कादायक घटना घडली. ज्यामुळं अवघ्या  दोन महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या या देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


प्रशासनानं यामध्ये दखल घालत या सागरी पुलावर पोलीसांची गस्त वाढविण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा मांडला असला तरीही या कामासाठी पोलिसांना आवश्यक सुविधा उपलब्ध न केल्या जाणं ही वस्तुस्थिती. अटल सेतूवर गस्ती वाहनांची व्यवस्था असली तरीही ही वाहनं स्वतंत्र नसून, त्यातून एमएमआरडीए कर्मचाऱ्यांसह इथं गस्त घालण्यात येते.  


दोन हद्दींमध्ये सागरी पूल... 


21.8 किमी अंतराच्या अटल सेतूचा एक टप्पा, अर्थात उरणच्या चिर्ले येथून सुरु होणारा 14.5 किमी अंतराचा भाग न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. तर, उर्वरित भाग मुंबई पोलिसांच्या हद्दीत येतो. या सागरी सेतूवर गस्त घालायची झाल्यास न्हावा शेवा पोलीस पथकाला थेट मुंबईपर्यंत जावं लागतं. मुळात पुलावर मध्ये थांबण्यासाठी कोणतीही सोय करण्यात आलेली नाही, ज्यामुळं या कामात अडथळा निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. 


हेसुद्धा वाचा : होळी- रंगपंचमीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांची खैर नाही; प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत 


 


MTHL च्या सुरक्षेच्या अनुषंगानंच आता वॉर्डन सहाय्यक देण्यासोबतच पोलिसांसाठी निवारा चौकी उभारण्याची मागणी वाहतूक पोलिसांच्या वतीनं एमएमआरडीएकडे करण्यात आली आहे. तेव्हा आता अटल सेतूवर पोलिसांसाठी निवारा चौकी उभारण्यात येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.