Holi 2024 : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. फक्त राज्यातच नव्हे, तर शहरातही बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून, प्रश्सनाचीही साऱ्यावर करडी नजर पाहायला मिळत आहे. होळीच्या दिवशी होणारी रंगांची उधळण आणि अनेकदा घणारे अप्रिय प्रसंग, त्यामुळं उत्सवाला लागणारं गालबोट अशी परिस्थिती ओढावू नये यासाठी मध्य रेल्वे आणि बेस्ट प्रशासनासह पोलीस यंत्रणाही सज्ज आहेत.
होळीसह रंगपंचमीच्या दिवशी लोकल ट्रेनवर रंग किंवा पाण्यानं भरलेले फुगे मारल्यास ते प्रवाशांना लागून त्यामुळं त्यांना इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळं अशी कृत्य न करण्याची ताकिद अतिउत्साहींना देण्यात आली आहे. फक्त रेल्वेच नव्हे, तर मुंबईतील बेस्ट बसवरही रंगाचे फुगे मारल्यास हे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल.
होळी- रंगपंचमीच्या दिवशी बस आणि लोकल ट्रेनवर फुगे मारण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. रंगपंचमीपूर्वी दोन - तीन दिवस आधीपासूनच अशा घटना घडण्यास सुरुवात होते. रेल्वे झोप़डपट्टी किंवा दाटीवाटीनं असणाऱ्या वस्तीतून पुढं जाताना अशा घटना घडतात, ज्यामुळं प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी आता रेल्वे प्रशासन कायद्याचीच मदत घेताना दिसत आहे.
रेल्वे प्रशासनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही ताकिद दिली असून, नागरिकांनी या नियमाचं उल्लंघ करू नये असं स्पष्टपणे बजावण्यात आलं आहे. रंगपंचमीच्या दिवशी किंवा होळीनिमित्त बरीच मंडळी सुट्टी नसल्या कारणानं नोकरीवर जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी घराबाहेर पडतात. पण, अशा वेळी काही अतिउत्साही घटकांमुळं त्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. आता मात्र अशा सर्व मंडळींना कायद्याचाच इंगा दाखवला जाणार आहे. त्यामुळं होळी- रंगपंचमीला अतिउत्साह नकोच!