Mumbai News : मुंबई... अनेकांचीच कर्मभूमी, काहींची जन्मभूमी तर काहींसाठी दर दिवशी नव्या संधी देणारं एक शहर. अशा या शहरात लहानसं का असेना पण, हक्काचं घर हवं हेच यातील बहुतांश जणांचं स्वप्न. पण, सर्वांनाच हे स्वप्न साकार करणं शक्य होतंय असंही नाही. कारण, मुंबईत घरांचे दर गगनाला भिडताना दिसत आहेत. शहरातील जुन्या वस्तींची जागा आता गगनचुंबी इमारतींनी घेतली आहे. तर, अनेक भागांमध्ये पुनर्विकासाचे वारेही वाहत आहेत. अशा या मुंबईतून सध्या मुंबईकर हद्दपार होत असतानाच इथं वास्तव्यास असणाऱ्यांपुढंही काही आर्थिक अडचणी उभ्या राहताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शहरातील अनेक भागांमध्ये पुनर्विकासाचे प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळं त्या परिसरातील मूळ रहिवाशांना विकासकांकडून घरभाडं देत इतर सदनिकांमध्ये निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अनेक ठिकाणी रहिवासीच त्यांच्या सोयीनं राहण्याची व्यवस्था करतात. पण, शहरामध्ये अशा भाडेतत्वावर राहणाऱ्यांचा खिसा आता आणखी हलका होणार आहे. कारण, शहरात साधारण 15 ते 20 टक्क्यांची भाडेवाढ झाली आहे. 


मुंबईत अनेक इमारतींच्या बांधकामांना वेग 


कोरोना महामारीमुळं शहरातील बऱ्याच पुनर्विकास कामांचा वेग मंदावला होता. पण हे संकट टळल्यानंतर या कामांना वेग मिळाला आणि येत्या काळात अनेक नव्या इमारतींमध्ये नागरिकांना त्यांच्या घरांचा ताबा मिळणाप आहे. पण, तत्पूर्वी मोठ्या संख्येनं अनेक कुटुंबांना अद्यापही भाड्याच्या घरांमध्ये राहावं लागत आहे. एक वर्ग असाही आहे जो नोकरीच्या निमित्तानं स्वत:च्या घरापासून दूर असल्यामुळं या शहरात भाड्यानं राहत आहे. पण, आता या सर्वच मंडळींना जास्तीचं भाडं भरावं लागणार आहे. घर भाड्यावर घेण्यापूर्वी भरली जाणारी अनामत रक्कम अर्थात डिपॉझिटमध्येही वाढ झाल्यामुळं महागाईची झळ आणखी तीव्र होताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : ईsss... रक्तपिपासू ढेकणांमुळं देश संकटात; मेट्रो, रेल्वे स्थानक, बस आणि घरांमध्ये सुळसुळाट 


 


घरभाड्याचे आकडे कमालीचे वाढत असतानाच इस्टेच एजंटही त्यांचा वाटा मागण्यासाठी सज्जच दिसत आहेत. सहसा एजंटच्या वाट्याला घरभाड्याचा एक वाटा जातो. त्यामुळं घर भाड्यानं घेणाऱ्यांची चारही बाजूंनी कोंडी होताना दिसत आहे.  


शहरातील कोणत्या भागात किती भाडं? 


वरळी 


1 आरके - 25 ते 30 हजार रुपये 
1 बीएचके - 30 ते 45 हजार रुपये 
2 बीएचके - 45 हजार आणि पुढे.... 


दादर पूर्व 


1 आरके - 15 ते 20 हजार रुपये 
1 बीएचके - 25 ते 30 हजार रुपये 
2 बीएचके - 30 ते 40 हजार रुपये 


पवई


1 आरके- 15 ते 20 हजार रुपये 
1 बीएचके - 20 ते 25 हजार रुपये 


सायन 


1 आरके - 17 ते 22 हजार रुपये 
1 बीएचके - 20 ते 25 हजार रुपये 
2 बीएचके - 25 ते 30 हजारा रुपये