बिहार नव्हे मुंबई! दोन ट्रॅकमध्येच कुटुंबांनी थाटला संसार; कारवाईच्या नावाखाली अधिकाऱ्यांची उडवाउडवी
Mumbai Local : मुंबईतील माहीम जंक्शन रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
Mumbai News : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असतात. पण काही प्रवासी अतिघाई किंवा स्टंटबाजीमुळे आपला जीव गमावतात. रेल्वे प्रशासनावर यांच्यासोबत रेल्वे प्रशासनासोबत अतिक्रमण करणाऱ्यांना रोखण्याचेही आवाहन असतं. मात्र वारंवार प्रयत्न करुनही अतिक्रमण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एक घटनेचा व्हिडीओ सध्या पश्चिम रेल्वेच्या माहिम स्थानकावरुन व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबईच्या माहीम जंक्शन रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनच्या रुळांवर बसून लोक जेवण शिजवत आहेत. तर काही लोक रुळांवर झोपलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
24 जानेवारीला पोस्ट केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये "माहीम जंक्शन येथे रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान" असे म्हटले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काही महिला रेल्वे रुळांच्या दरम्यान ठेवलेल्या स्टोव्हवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. तर काही मुली त्याच भागात अभ्यास करताना दिसतायत. लहान मुले आजूबाजूला धावताना दिसत आहेत आणि काही व्यक्ती रुळांवर झोपलेल्या देखील होत्या. सोशल मीडियावर व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांना हा धोकादायक प्रकार असल्याचे म्हटलं आहे. तसेच कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. हे खूप धोकादायक, कृपया कोणीतरी यावर कारवाई करा, असे एका युजरने म्हटलं आहे. तर आणखी एका यूजरने हार्बर रेल्वे मार्गाच्या बहुतांश भागांवर हे दृश्य आहे, असं म्हटलं. जेव्हा तुमचे जीवन खरोखरच रेल्वे रुळावर असते, असेही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. रेल्वे अधिकारी रेल्वेची जमीन आणि प्रतिबंधित क्षेत्राच्या सुरक्षेबाबत जबाबदारी दाखवत नाहीत. आरपीएफ कुठे आहे? मंत्री आणि अधिकारी जबाबदार असले पाहिजेत, असे एका युजरने म्हटलं आहे.
दरम्यान, लोकांचा रोष पाहून मध्य रेल्वेच्या डीआरएमने मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेच्या डीआरएमला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. तर श्चिम रेल्वेच्या डीआरएमने ही बाब रेल्वे संरक्षण दल मुंबई सेंट्रल विभागाकडे पाठवली आहे. त्यामुळे कारवाई करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवलं जात असल्याचे म्हटलं जात आहे.