Mumbai News : ओशिवारामध्ये अग्नितांडव! फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग
मुंबईतील अंधेरीच्या ओशिवरा भागात ही भीषण आग लागली आहे. फर्निचर मार्केटमध्ये लागलेल्या या भीषण आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे
Mumbai News : मुंबईच्या (Mumbai) ओशिवारा (Oshiwara) भागात भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. ओशिवाराच्या फर्निचर मार्केटमध्ये (furniture market) लागलेल्या या आगीने रौद्र रुप धारण केले होते. जोगेश्वरीतील राम मंदिराजवळील फर्निचर मार्केटजवळ ही आग लागली आहे. या घटनेत आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग एवढी भीषण आहे की, मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. या आगीमुळे धुराचे लोट उठवले होते. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. यापूर्वी रिलीफ रोडवरील फर्निचरच्या गोदामाला आग लागल्याचे वृत्त आले होते. मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. तपासानंतरच आग लागण्याचे कारण समोर येईल. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकरेनेही दिली माहिती
आग लागल्याची ठिकाणी मुंबई अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. ते त्यांचे काम करत आहेत. मुंबई पोलिसांचे आभार, असे क्रांती रेडकरेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
40 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
ओशिवरा फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत 30 ते 40 दुकाने जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीमागे सिलिंडरचा स्फोट झाल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. परिसरात 200 हून अधिक दुकाने आहेत. अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही.