मनश्री पाठक, झी मीडिया, मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मंत्रालयातील (Mantralay) कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केली. या महिलेची ओळख पटली आहे. मंत्रालयात तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी पोलीस दाखल झाले आणि तिचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याची माहिती समोर आलीये. मात्र, पोलिसांना जबाब देण्यासाठी महिला तयार नसून ती महिला दरवाजा उघडत नसल्यानं पोलिसांसमोर अडचण उभी राहिली. त्याचबरोबर महिला पोलिसांच्या पथकालाही पाचारण करण्यात आलंय. त्या महिलेवर यापूर्वीही गुन्हा दाखल असून ती मानसिकरित्या आजारी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,  मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. या महिलेला मंत्रालयात प्रवेश कसा मिळाला, यासंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली असून सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. स्थानिक भाजप पदाधिकारीही या महिलेच्या घराबाहेर पोहोचले असून महिलेचं समुपदेशन करुन उपचार करावेत अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यापूर्वीही भाजपच्या माहिम विधानसभा कार्यालयात ही महिला चॉपर घेऊन आली होती अशी माहितीही समोर आली आहे.


पोलिसांकडून या महिलेच्या घराबाहेर महिला पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. या महिलेच्या भाऊ आणि बहिणीला संपर्क केला असता पोलिसांनीच योग्य तो निर्णय घ्यावा असं उत्तर देण्यात आलं. या महिलेविरोधात याआधीही चार वेळा महिलेविरोधात तक्रार दाखल केल्याचं सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितलं. यासंदर्भातली केस कोर्टात गेल्यानंतर महिला अस्खलीत इंग्रजीत संभाषण करत होती, त्यावेळी कोर्टाने महिलेला मानसिक अस्थिर मानण्यास नकार दिला होता.


मनसे कार्यालयातही गेली होती महिला


ही महिला दोन-चार दिवसांपूर्वी मनसेच्या शाखेत तक्रार घेऊन आली होती अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलीय. माझी बिर्याणी कुणीतरी खाल्ली अशी या महिलेची तक्रार होती. महिला मानसिक दृष्ट्या अस्थिर असून बळाचा वापर न करता समुपदेशकाच्या मदतीने तिला यातून बाहेर काढलं पाहजे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.


'घटनेची चौकशी करणार'


एखादी बहीण चिडली असेल किंवा कुणी पाठवलं असेल तर ते समजून घेऊ, त्याचबरोबर घटनेची चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय लोकाभिमुख आहे. तिथं तोडफोडीचा प्रकार घडणं हे एक षड्यंत्र आहे, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय. तोडफोड केलेल्या महिलेची मानसिकता तपासायला हवी अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यानी केली आहे. ती स्वत:हून आली कोणी तिला कुणी पाठवलं याचाही तपास होणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या.


विरोधकांची टीका


महिला किती रागात आहेत हे यावरून दिसत असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणालेत. त्याचबरोबर आज पाटी काढलीये उद्या हीच पाटी या महिला डोक्यात घालेलं अशी टीकाही वडेट्टीवारांनी केलीये.