प्रथमेश तावडे झी मीडिया नालासोपारा: नालासोपाऱ्यात दिवसाढवळ्या सराफाला लुटून त्याला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नालासोपारा पश्चिमेकडील साक्षी ज्वेलर्स मधील घटना आहे. दोन अज्ञात आरोपींनी दुकानात शिरून लुटमार करीत धारदार शस्त्राने सराफाची हत्या केली. 

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुकानाचे मालक किशोर जैन दुकानात प्रवेश करीत असताना आरोपींनी गिऱ्हाईक असल्याची बतावणी करत दुकानात प्रवेश केला. त्यानंतर जैन यांची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. दिवसाढवळ्या हत्या आणि दरोड्याचा या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. 


दुकानदारांनी घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सध्या तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या हत्या व दरोड्याचा या प्रकारामुळे नालासोपारा शहरात एकच खळबळ उडाली आहे.