मुंबई : मंगळवारी उत्साहात पार पडलेल्या दहिहंडीच्या सणाला गालबोट लागलं. २ गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर काही गोविंदा जखमी झाले. या सगळ्या घटनांनंतर दहिहंडी हा उत्सव नक्की कसा साजरा झाला पाहिजे? या प्रश्नावर पुन्हा चर्चा होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र असं असताना एक समाधानाची बाब म्हणजे ३ वर्षापूर्वी दहिहंडीत जखमी झालेला एक गोविंदा तब्बल ३ वर्षांनी चालू लागला आहे. नालासोपारामध्ये दहीहंडीचा सराव करताना जखमी झालेला प्रवीण रहाटे हा तरुण तीन वर्षांनंतर चालू लागला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून लवकरच तो पूर्ण बरा होण्याची आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियांना आणि त्याच्या गोविंदा मंडळाला एक आशेचं किरण दिसू लागलं आहे. 


प्रवीण रहाटे हा नियमित गोविंदा पथकात सहभागी होऊन दहीहंडी फोडायचा. २०१३ मध्ये तुळिंज येथे नऊ  थरांचा सराव करताना त्याचे पथक कोसळले आणि खाली उभा असलेला प्रवीण खाली पडला. त्याच्या कमरेजवळील मणका तुटला आणि तो जायबंदी झाला. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र तो अंथरुणालाच खिळला होता.


नालासोपारा येथील कै. रमाकांत वैद्य चॅरिटेबल ट्रस्टने त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी त्याला गेल्या वर्षी दत्तक घेतले होते. त्याला उपचार मिळणे सुलभ व्हावे यासाठी स्वतंत्र भाडय़ाची खोली घेऊन देण्यात आली आहे. त्याच्यावर फिजिओथेरेपी सुरू आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले असून प्रवीण आता स्वत:च्या पायाने घरात चालू लागला आहे. प्रवीण स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. त्याची नोकरी गेली. त्याचे आई-वडील नसल्याने तो मावशीकडे राहत होता; परंतु बेरोजगारी आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च यामुळे तो पुरता कोलमडला होता. आता चालू लागल्याने लवकरच बरा होऊन कामाला जाऊ  शकेन याचा आनंद त्याने व्यक्त केला.