मुंबईत आयएनएस कलवरी पाणबुडीचं आज लोकार्पण, पंतप्रधान मोदींची खास उपस्थिती
आयएनएस कलवरी पाणबुडीचं आज लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. डिझेल इलेक्ट्रीकवर चालणारी पाणबुडी नौदलात दाखल होत आहे.
मुंबई : आयएनएस कलवरी पाणबुडीचं आज लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. डिझेल इलेक्ट्रीकवर चालणारी पाणबुडी नौदलात दाखल होत आहे.
डिझेल इलेक्ट्रिकवर चालणारी पाणबुडी
तब्बल १७ वर्षांच्या खंडानंतर भारतीय नौदलात INS कलवरीच्या रूपाने डिझेल इलेक्ट्रिकवर चालणारी पाणबुडी दाखल होत आहे. मुंबईत नौदलाच्या गोदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा पार पडणार आहे.
आयएनएस सिंधुराष्ट्र ही पाणबुडी नौदलात
याआधी १९ जुलै २००० या दिवशी आयएनएस सिंधुराष्ट्र ही पाणबुडी नौदलात सामील झाली होती. २००५ मध्ये फ्रान्स बरोबर ३ अब्ज डॉलर्सच्या कराराद्वारे तंत्रज्ञान हस्तांतराद्वारे डिझेल इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या स्कॉर्पिन वर्गातील ६ पाणबुड्या बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते.
INS कलवरी ही पहिली पाणबुडी
यानुसार पहिली पाणबुडी २०१३ मध्ये दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तब्बल चार वर्ष उशिराने स्कॉर्पिन वर्गातील INS कलवरी ही पहिली पाणबुडी आता नौदलात दाखल होत आहे.उर्वरित पाच पाणबुड्या २०२१ पर्यंत नौदलात दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. डिझेल- इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या कलवरी वर्गातील पाणबुडयांचे तंत्र जगात सर्वोकृष्ठ समजले आहे.