ST Bus Strike : शरद पवारांनी घेतला तीन तास आढावा, चर्चा झाली पण...
एसटी संपाबाबत शरद पवार यांनी बैठक बोलावली, तब्बल तीन तासाहून अधिक वेळ ही बैठक चालली
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Workers Strike) संप सुरु आहे. मुंबईत आझाद मैदानात गेल्या 2 आठवड्यांपासून एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायला एसटी कर्मचारी तयार नाहीत. विलिनीकरणाशिवाय आझाद मैदान सोडणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.
तीन तास चालली बैठक
या संपावर चर्चा करण्यासाठी आज मुंबईतल्या नेहरु सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. जवळपास तीन तासाहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत संपावर कसा तोडगा काढता येईल याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठकीनंतर दिली.
विद्यार्थी, प्रवाशांचे हाल
गेले काही दिवस एसटीचा संप सुरु आहे. एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि लोकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या संदर्भात शरद पवार यांनी अनिल परब आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत संपाबाबत काय मार्ग काढता येईल याचा आढावा घेण्यात आला.
शरद पवार यांनी घेतला आढावा
एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रुळावर येईल त्याबाबतच्या उपाययोजना आणि संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे. आमच्याकडून शरद पवार यांना माहिती देण्यात आली. तसंच याबाबत काय पर्याय निर्माण करता येतील आणि काय मार्ग काढता येईल यातून कामगारांचं आणि जनतेचं समाधान कसं करता याबाबत चर्चा झाल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
विलीनीकरणाच्या मुद्दावर चर्चा
विलीनीकरणाचा मुद्दा हा उच्च न्यायलायने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात सरकारने काय बाजू मांडावी याबाबतही शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली. विलीनीकरणाचा मुद्दायवर समितीचा जो अहवाल येईल तो आम्ही स्विकारु, विलीनीकरणाचा प्रश्न समितीच्या माध्यमातूनच येईल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
याव्यतिरिक्त कामगारांचे इतर काही प्रश्न आहेत, त्यांच्या पगारवाढीचा मुद्दा आहे. इतर राज्यात कसं ट्रान्सपोर्ट चालतं, त्यांचे पगार काय आहेत. या सर्वांचा सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं की शासन दोन पावलं पुढे येईल, आपण दोन पावलं पुढे या, यातून मार्ग काढता येईल असंही अनिल परब यांनी सांगितलं.