राज ठाकरेंच्या `साबणांच्या बुडबुड्यां`ना गडकरींनी असं दिलं प्रत्यूत्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झालेल्या जाहीर भाषणात भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर टीका केली होती. ही टीक गडकरींना चांगलीच झोंबलीय.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झालेल्या जाहीर भाषणात भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर टीका केली होती. ही टीक गडकरींना चांगलीच झोंबलीय.
राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणात केलेल्या टिकेमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक विकास आणि पाणीपुरवठा मंत्री नितीन गडकरी व्यथित झालेत. त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंना त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच 'कृष्णकुंज'वर एक यादीच धाडलीय. राज्यात केलेल्या रस्ते विकास कामांची ही यादी आहे..
'जाहीर चर्चा करायला तयार...'
सुमारे पाच लाख कोटींची कामे सुरु झाल्याचा दावा यात गडकरींनी आपल्या पत्रात केलाय. त्यापैंकी चार लाख २७ कोटींच्या कामांची ही यादी आहे.
राज ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. मी पाठवलेल्या कामांच्या यादीबद्दल शंका असल्यास शिवाजी पार्कवर जाहीर चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचं सांगत गडकरींनी आपल्या पत्रात राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय.
'साबणाचे बुडबुडे'
राज ठाकरे यांनी गडकरींच्या रस्ते विकास कामांच्या घोषणांची 'साबणाचे बुडबुडे' म्हणत खिल्ली उडवली होती. रविवारी झालेल्या या भाषणानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी गडकरी यांनी कृष्णकुंजवर ही यादी धाडली.