धारावी कोरोनाग्रस्त मृतांचं निजामुद्दीन मरकज कनेक्शन
१७ ते २३ मार्च पर्यंत हे लोक धारावीमध्ये तळ ठोकूण बसले होते.
मुंबई : केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या काळात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचं जाहीर केलं होतं. तरी देखील दिल्लीत तबलिगी जमातचा मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मुस्लीम भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातील अनेकांना करोनाची लागण असल्याने एकमेकांच्या संपर्कामुळे इतरांनाही करोनाची लागण झाल्याने करोनाचा प्रादुर्भाव फैलावला असल्याचं उघड झालं आहे.
महत्त्वाचं म्हणजे निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्यांमधील १० लोक जवळपास ६ दिवसांसाठी धारावीमध्ये लपून बसल्याची बातमी समोर येत आहे. पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान हे सर्व धारावीमध्ये वेग-वेगळ्या ठिकाणी लपून बसले होते. शिवाय धारावीमध्ये ज्या ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तो सुद्धा तबलीगी जमातीच्या लोकांच्या संपर्कात आला असावा, असा संशय पोलीस व्यक्त करत आहेत.
शिवाय १७ ते २३ मार्च पर्यंत हे लोक धारावीमध्ये तळ ठोकूण बसले होते. त्यानंतर २३ मार्च रोजी ते केरळमध्ये निघूण गेले. दिल्लीतल्या निझामुद्दीन भागात जे घडले, त्यामुळे अख्ख्या देशाची झोप उडाली आहे. निझामुद्दीन भागातल्या तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात देशभरातून हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा तेलंगणात मृत्यू झाला आहे.
या सर्व घडामोडींनंतर केंद्र आणि राज्य सरकारांची झोप उडाली आहे. कारण देशातल्या अनेक भागात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती आढळून येतायत. त्याचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर येत आहे. निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना कोरोना झाल्याचे पुढे आले. तर काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मौलाना साद हे २८ मार्चपासून गायब आहेत.