शनिवार- रविवारी मुंबईत पाणीपुरवठा बंद; तुम्ही राहता त्या भागावरही होणार परिणाम, आताच पाहून घ्या
Mumbai Water Cut: शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस अनेकांच्याच सुट्ट्यांचे. सध्या बऱ्याच शाळांना सुट्टी असल्यामुळं मुलंबाळं आणि आठवडी सुट्टीमुळं मोठेही या दिवशी घरातच. पण, याच दिवशी पाणी आलं नाही तर?
Mumbai Water Cut: एकिकडे मुंबईला उकाड्यानं हैराण केलेलं असतानाच आता त्यात शहरातील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कारण, ऐन उन्हाळ्याच्याच दिवसांमध्ये आणि त्यातही शनिवार- रविवारी शहराच्या मुख्य भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलअभियंता विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
27 मे 2023 शनिवार ते 28 मे 2023, रविवार या दिवासंमध्ये शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मध्य मुंबईत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनीला कुठे गळती आहे का, हे शोधण्यासाठी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जिथं प्राथमिक स्वरुपात पाणीकपात लागू करत गळती हेरून तिच्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येतील. याच कारणास्तव शनिवार आणि रविवारी दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळ या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल.
दादर - माटुंग्यात काय परिस्थिती?
गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, कापड बाजार या भागात 27 मे शनिवारी संध्याकाळी 4 ते रात्री 10 या कालावधीत पाणीपुरवठा होणार नसल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
हेसुद्धा वाचा : Weather Forcast : ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि पाऊस...; देशभरातील हवामानाचा अंदाज एका क्लिकवर
तर, धोबी घाट, सातरस्ता, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, या परिसरात दिनांक 28 मे रविवारी पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल.
जी दक्षिण विभागही होणार प्रभावित
संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसरातही पाणीपुरवठा प्रभावित राहणार असून, 27 मे, शनिवार दुपारी 2.30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.
थोडक्यात सुट्टीच्या दिवसांमध्येच मुंबईच्या मध्य भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा!