Weather Forcast : ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि पाऊस...; देशभरातील हवामानाचा अंदाज एका क्लिकवर

Weather Forcast : मे महिना अखेरीस आलेला असतानाच आता देशात मान्सूनच्या वाऱ्यांचं आगमन होण्यासही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मान्सूनच्या आधी नेमकी काय परिस्थिती आहे हे इथं पाहाच.   

सायली पाटील | Updated: May 26, 2023, 07:08 AM IST
Weather Forcast : ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि पाऊस...; देशभरातील हवामानाचा अंदाज एका क्लिकवर
Weather forcast Maharashtra india rainfall monsoon predictions latest updates

Weather Forcast : अंदमान- निकोबार बेट (Andaman Nicobar) समुहांमध्ये असणाऱ्या मान्सूननं आगेकूच करण्यास सुरुवात केलेली असतानाच आता तो संपूर्ण देशभरात कधी विस्तारतो याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिलेली आहे. दरम्यान मान्सून येण्याआधी देशातील आणि मुख्यत्वे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीमध्ये आर्द्रतेचं प्रमाणही अधिक असल्यामुळं तापमानाचा हा दाह अधिक असल्याचं भासत आहे. याच उष्णतेनं होरपळून निघणाऱ्यांसाठी एक दिलासा म्हणजे मान्सूच्या आधी राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा शिडकावा होणार आहे. 

हवामान विभागानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण असेल, तर काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसणार आहेत. इतकंच नव्हे, तर काही भागांमध्ये सोसाट्याचा वाराही सुटेल असा अंदाज वर्तवत हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. 

देशभरातील तापमानात घट? 

तुम्ही सध्याच्या दिवसांमध्ये एखाद्या ठिकाणी पर्यटनाच्या हेतूनं जाणार असाल तर, हवामान तुम्हाला फार त्रास देणार नाही. कारण, सध्या सक्रीय असणाऱ्या एका पश्चिमी झंझावातामुळं देशभरातील तापमानात काही अंशांनी घट नोंदवली जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

एक पश्चिमी झंझावात देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पठारी भागाच्या दिशेनं निघाला आहे. तर, चक्रवातसदृश वारे पंजाब आणि पाकिस्तान प्रांतावर घोंगावत आहेत. याच वाऱ्याचा एक झोत पश्चिम बंगालच्या दिशेनंही गेला आहे. महाराष्ट्रावरही या वाऱ्याचे काही अंशी परिणाम होताना दिसत आहेत. 

हेसुद्धा वाचा : तो आलाय...! अरबी समुद्रातील हालचाली वाढताच Monsoon तळकोकणात येण्याची तारीख ठरली

 

वरील परिस्थितीच्या धर्तीवर मागील 24 तासांमध्ये हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, नागालँड, उत्तराखंड, कर्नाटकचा किनारपट्टी भाग आणि ओडिशा या भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर, राजस्थान आणि हरियाणामध्ये धुळीचं वादळ आलं. 

पुढील 24 तासांच्या हवामानाचा अंदाज वर्तवत स्कायमेटनं दिलेल्या इशाऱ्यानुसार हिमालयाच्या पर्वतीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो तर काही भागांना बर्फवृष्टीचाही तडाखा बसू शकतो. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि धुळीचं वादळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर, सिक्कीम, ओडिशा. आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडूमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. थोडक्यात येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनची वाटचाल वेगानं सुरु असतानाच देशातील तापमानात काही अंशांनी सातत्यानं घट नोंदवली जाऊ शकते.