हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : प्रियकराने मित्राच्या मदतीने गळा चिरून प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. आठवड्याभरापूर्वी एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह वैतरणा नदीपात्रात आढळून आला होता. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करुन या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर कर यासाठी बळजबरी करणाऱ्या प्रेयसीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये समोर आली आहे . पालघरमधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेलं एक महिलेचे धड आढळून आलं होतं. या प्रकरणात तपास करताना पालघर पोलिसांनी धक्कादायक माहिती उघडकीस केली आहे. महिलेच्या हातावर गोंदलेले नाव आणि पायातल्या जोडव्यांच्या आधाराने पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली.


गेल्या महिन्यात मोखाडा जवळील वैतरणा नदीवरील पुलाखाली शीर नसलेला मृतदेह सापडला होता. त्यानंतर जव्हार पोलिसांसह  स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपास सुरु केला होता. मृतदेहाच्या हातावर ममता असं गोंदवलं होतं. पायांमधील जोडव्यांवरुन आणि पोषाखावरुन ही महिला आदिवासी समाजाची असल्याचा अंदाज बांधण्यात आला. त्यामुळे महिलेची ओळख पटवण्यासाठी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, मुंबई परिसरात शोध सुरु करण्यात आला.


नेमकं काय घडलं?


सोलापूरमधील सुनील यादव याचं एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. मात्र ही महिला वारंवार लग्न करून प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्याची बळजबरी करत असल्याने आरोपी सुनील यादव याने आपल्या साथीदार महेश बडगुजर याच्या मदतीने प्रेयसीची निर्घृण हत्या करत मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिचं मुंडक शरीरापासून वेगळ करून वैतरणा नदीत फेकलं होतं. फिरायला लोणावळ्याला जाऊ असं सांगत या दोन्ही आरोपींनी या तरुणीला इंडिका गाडीत बसवून या ठिकाणी आणल्याचं निष्पन्न झालं. मृतदेह सापडल्यानंतर पालघरच्या मोखाडा पोलीस ठाण्यात कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस तपास करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे .


कसा लागला आरोपींचा शोध?


महिलेच्या पायातल्या जोडव्यांबाबत माहिती घेतली असता ती शिरपूर भागात तयार होत असून पावरी समाजाच्या महिला त्या घालत असल्याचे समोर आले. या जोडव्यांवर ज्वेलर्सच्या तीन अक्षरी निशाण्यांवरुन शेवटी पोलीस ज्वेलरपर्यंत पोहोचले. त्यानंतर या समाजाच्या महिलांची मतदार यादी तपासली. त्यानंतर पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील महत्त्वाच्या लोकांची बैठक घेऊन व्हाट्सअप ग्रुप तयार केला. त्या ग्रुपमध्ये महिलेसंदर्भात माहिती देताच एका व्यक्तीने ओळख पटवली. त्या व्यक्तीने आपली भाची बेपत्ता असल्याचे सांगत पोलिसांना फोटो आणि तिचा मोबाईल नंबर दिला. पोलिसांनी त्या क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध लावला आणि त्यांना ताब्यात घेतलं.