मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना स्थान मिळणार ?
राज्यातील जनतेला शिंदे-फडणवीस (SHINDE GOVERNMENT) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची (CABINET EXPANSION) प्रतीक्षा असताना कोणाकोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस सरकारच्या काळात मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागणार का, याची अनेकांना उत्सुकता आहे. अशा वेळी स्वतः पंकजा मुंडे यांनी यावर भाष्य केले आहे.
'कोणत्याही मंत्रिमंडळात सर्व जाती, विभागांना स्थान मिळेल या काळजी घेतली जाते. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातही सर्वांचे प्रतिनिधित्व असेल याची काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे' असे पंकजा मुंडे म्हणाला. मुंबईत आज त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मंत्रिमंडळात ओबीसींना स्थान मिळेल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी पंकजांनी हे सूचक विधान केले.
याआधी विधानपरिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे समर्थक अर्थातच त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी आग्रही असताना आता फडणवीस आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही?
शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. या प्रकरणात असलेल्या विविध गुंतागुंतीच्या मुद्द्यांमुळे सरन्यायाधीशांनी या प्रकरणी मोठ्या खंडपीठाची गरज व्यक्त केली. मात्र गटनेता निवडणं हा पक्षांतर्गत मुद्दा आहे. आणि बहुमत असलेला गट गटनेता नेमू शकतो, अशी महत्त्वाची टिप्पणी कोर्टानं सुनावणी दरम्यान केली. या प्रकरणी सर्व पक्षकारांना 27 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.१ ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे.
मंत्रीमंडळ विस्ताराकडे लक्ष
सुप्रीम कोर्टामधल्या आजच्या सुनावणीनंतर लक्ष लागलंय ते मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे. या महिना अखेरपर्यंत कॅबिनेट विस्तार निश्चित होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्याचा विस्तार या महिन्याच्या शेवटी होणार आहे. ऑगस्टमध्ये पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाआधी पहिल्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात आज किंवा उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार बाबत पुन्हा एकदा हालचालींना वेग सुरू झाला आहे. झी24तास ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गटाचा या आठवड्यात विस्तार करावा म्हणून आग्रह आहे पण याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज किंवा उद्या चर्चा करतील. दिल्लीतल्या भाजपांच्या नेत्यांचे म्हणणं आहे की या महिना अखेरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करावा तूरतास मंत्रिमंडळ विस्तार पहिल्या टप्प्यात लहान असावा असं मत आहे. येणारं पावसाळी अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असून तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं जवळपास दिसून येत आहे. तारीख मात्र निश्चित कोणती हे अद्यापही समजत नाहीये असं मत भाजपातल्या एका वरिष्ठ नेत्यांनी नोंदवलं आहे.