नवा ट्विस्ट! गायब असलेल्या परमबीर सिंग यांचं प्रतिज्ञापत्र, केला हा दावा
अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप करणारे परमबीर सिंह आरोपांनंतर गायब आहेत
मुंबई : राज्यात गाजत असलेल्या 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अनिल देशमुखांविरोधात आणखी कोणतेही पुरावे नसल्याचं त्यांनी या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांनी आपल्याकडे जास्तीचे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. तशा आशयाचं प्रतिज्ञापत्र त्यांनी अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे सादर केलं आहे. महाराष्ट्र सरकाकरने माजी न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोग गठित केलं आहे.
चांदीवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांना अनेक समन्स बजावण्यात आले आहेत, पण सिंह परमबीर सिंह अद्याप एकाही सुनावणीला उपस्थित राहिेलेले नाहीत.
परमबीर सिंह बेल्जियममध्ये?
दरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंह बेल्जियममध्ये असल्याचं ट्विट त्यांनी केलं होतं.
ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का? असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं होतं.