CM Eknath Shinde : मुंबईतल्या कोव्हिड सेंटर कथित (BMC Covid Centre Scam) घोटाळाप्रकरणी सध्या ईडीची चौकशी सुरु आहे. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thckeray) निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाणांच्या घरावर ईडीने (ED) धाड टाकली. तर अधिकारी संजीव जैस्वाल, नितीन गुरव, संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, संजय शाह यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. यावर आज उद्धव ठाकरे यांनी पीएम केअर फंडाची चौकशी का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला आहे. याला मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे.  कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु आहे, ईडी ही केंद्रीय तपासयंत्रणा आहे. त्यात कॅगचे ताशेरे आहेत. हा जनतेचा पैसा आहे. कोविड सारखा भयंकर आजार होता, माणसं मरत होती आणि तिकडे लोकं पैसे खात होते. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हे काय चांगलं आहे का? असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

500-600 रुपयांच्या डेड बॉडीच्या बॅगची किंमत 5 आणि 6 हजार लावत असाल तर यापेक्षा दुसरं काय मोठं पाप असू शकतं. त्यामुळे याचा हिशोब तर द्यावाच लागेल असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. यात आम्ही कुठेही राजकीय सुडापोटी कोणतीही कारवाई केलेली नाही. ईडीच्या कारवाईत आम्ही हस्तक्षेप केलेला नाही. जे काही करतायत ते ईडीचे आधिकारी करत आहेत असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. 


तुम्ही पाप केलं नसेल तर सत्याला सामोरं जा, दुध का दुध, पाणी का पाणी होऊन जाईल असंही शिंदे यांनी म्हटलंय. साडेबारा हजार कोटी रुपयांचा जर गैरव्यवहार झाला असेल कॅगच्या म्हणण्यानुसार तर जनतेसमोर येऊ द्या. हे जनतेचे पैसे आहेत. आपण विश्वस्त आहोत, जनता मालक आहे. सर्व पैसे जनतेचे आहेत. एकेक पैशाचा हिशोब लोकप्रतिनिधींनी दिला पाहिजे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. 


लोकप्रतिनिधी असू दे किंवा अधिकारी असू दे ज्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांच्या पाठिवर शाबासकीची थाप मिळेल, ज्यांनी लोकांच्या पैशांचा अपहार केला असेल, त्यांनी कारवाईला सामोरं गेलं पाहिजे असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. 


गेल्या अनेक वर्षात ज्या सुविधा, चांगले रस्ते, दिवा-बत्ती, पाणी, स्वच्छता, आरोग्य अशा मुलभूत सुविधा मुंबईकरांना मिळायला हव्या होत्या आणि त्यापासून वंचित ठेवण्याचं ज्यांनी पाप केलं, त्यांना हिशोब द्यावं लागेल असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.