राज्यात कायदा-सुव्यस्था ढासळल्याचा आरोप, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?
राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये दुमत?
मुंबई : राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करणाऱ्या भाजपमध्येच राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरुन दुमत दिसत आहे. सध्या राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असा आरोप करत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. तर भारतीय जनता पक्षाची अशी कोणतीही मागणी नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
प्रवीण दरेकर यांचा आरोप
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच लोक कायदा हातात घेत आहेत असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. अलिकडच्या काळातील घटना पाहिल्या तर एका सेकंदात राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी स्थिती असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.
सत्ता येत असते जात असते. पण सत्तेचा उन्माद आणि सत्तेचा वापर करुन राज्यात अशी गुंडगिरी कधीच झाली नसल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. एका बाजूने हल्ला केला तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा प्रतिहल्ला होईल असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे.
राष्ट्रपती राजवटीची मागणी आमची नाही
भाजपाची पोलखोल अभियाचा कार्यक्रम हा परवानग्या घेऊन सुरु आहे. या अभियानावर हल्ला करणं हे भ्याड पणाचं लक्षण आहे. सरकारची परवानगी घेऊन दहशत माजवण्याचं काम सुरु आहे असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला असला तरी राष्ट्रपती राजवटीची मागणी आमची नसल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे.
मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे मॉब लिंचिंगचा प्रयत्न आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. एकट्यावर असे हल्ले करणार असाल तर तुम्हीही कधी एकटे प्रवास कराल, आणि काळोखातून असे हल्ले होऊ शकतात, हे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिला आहे.
लोकशाहीला लोकशाहीने उत्तर देऊ तर ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देऊ. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्थेची स्थिती मोडकळीस आली आहे. याचं सर्वस्वी पाप सत्ताधाऱ्यांचं आहे. गृहविभागाकडून पोलिसांकडून पक्षपातीपणा होतोय असं शेलार यांनी म्हटलंय.