वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कारची खरेदी - मुख्यमंत्री
राज्य सरकार यापुढे वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कारच खरेदी करणार आहे.
मुंबई : राज्य सरकार यापुढे वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कारच खरेदी करणार आहे. पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांना फाटा देण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज ५ इलेक्ट्रीक कार सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हा कार्यक्रम पार पडला.
स्वतः मुख्यमंत्र्यांनी या इलेक्ट्रीक कारमधून फेरी मारली. डीसी किंवा एसी करंटवर या गाड्या चार्ज करता येणार आहेत. मंत्रालयात तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन ठेवण्यात आलं आहे. एकदा कारची बॅटरी चार्ज केल्यावर १२० किमी अंतर पार करू शकेल.
पुढील सहा महिने या गाड्यांची कामगिरी पाहिली जाईल. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी १४ गाड्या घेणार आहे. येत्या वर्षभरात १००० गाड्या शासकीय सेवेत सामावून घेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.