अखेर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचे थकीत पाणी बिल भरले
मुंबई महापालिकेच्या डी वॉर्डमध्ये पाणी बिलाची ही रक्कम जमा करण्यात आली.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाचे आणि सह्याद्री अतिथीगृहाचे थकित पाणी बिल अखेर मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अदा करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या डी वॉर्डमध्ये पाणी बिलाची ही रक्कम जमा करण्यात आली. यासंदर्भातील वृत्त समोर आल्यानंतर अनेकांनी सरकारच्या कारभारावर टीका करायला सुरुवात केली होती. विधानसभेतही आज याचे पडसाद उमटताना दिसले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मुंबईत कोट्यवधी लोक राहतात. एखाद्याने पाणीपट्टी भरली नाही तर पाण्याचे कनेक्शन तोडले जाते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी बिल थकीत असूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. अशावेळी शासकीय अधिकारी काय झोपा काढत होते का? प्रशासनाने वर्षा बंगल्याचा पाणीपुरवठा तात्काळ तोडला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना बिना आंघोळीचे सभागृहात येऊ द्या, असे सांगत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला होता.
.... म्हणून मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा' बंगला डिफॉल्टर यादीत
मात्र, मुख्यमंत्र्यांनी कोणतेही पाणी बिल थकीत नसल्याचा दावा केला होता. वर्षा बंगल्याचे कोणतेही बिल थकीत नाही. उलट जे बिल भरले होते तेच प्रशासनाकडून पुन्हा पाठवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. कोणतीही थकबाकी नसल्याने पाणी तोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी सभागृहात रोज आंघोळ करूनच येणार, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना लगावला होता.