दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : वादग्रस्त सनदी अधिकारी आणि एमएमआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार हे शासकीय सेवेतून आज निवृत्त झाले. मात्र, राज्य सरकारने त्यांची पुन्हा त्याच पदावर एका वर्षासाठी नियुक्त केली आहे. 


वादग्रस्त कारकिर्द


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधेश्याम मोपलवार यांची ही नियुक्ती १ मार्च २०१८ पासून करारपद्धतीने करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाची आखणी झाल्यानंतर या महामार्गालगतच्या जमीनींबाबत अनेक वाद समोर आले. या महामार्गालगतच्या मोक्याच्या जागा अधिकाऱ्यांनी विकत घेतल्याचे आरोप झाले. यात मोपलवार यांचेही नाव समोर आले. तर दुसरीकडे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मोपलवार यांच्या संभाषणाची एक सीडी समोर आली होती. या सीडीमध्ये मोपलवार हे बोरीवलीतील एक शासकीय भूखंड बिल्डरला स्वस्तात देण्यासाठी लाच मागत असल्याचा दावा करण्यात आला. 


मोपलवार यांना क्लीनचीट


ही दोन प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांना दीर्घ रजेवर पाठवले होते. तसेच त्यांची चौकशी लावली होती. मात्र चार महिन्यातच मोपलवार यांना क्लीनचीट मिळून त्यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली होती. विरोधकांनी या चौकशीबाबतही आक्षेप घेतले होते. असे असताना मोपलवार यांना निवृत्तीनंतर पुन्हा तिच जबाबदारी देण्यात आली आहे.



कशासाठी पुन्हा नियुक्ती?


मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग, तसेच इतर महत्त्वाच्या प्रकल्पातील जमीन संपादनाची कामे अंतिम टप्प्यात असल्याने ती पूर्ण करण्यासाठी मोपलवार यांची करारपद्धतीने नियुक्त करत असल्याचे शासनाने या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.