मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 22 जुलैपासून आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण बेपत्ता झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भागाच्या मदतीसाठी 6 हजार कोटींची गरज, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिवृष्टीमुळे कोकण आणि महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांचं नुकसान झालं असून यात घरांचं आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. 


वारंवार घडणार्‍या या घटनांचा विचार करता शासन मदत करणारच आहे, पण यावर कायमस्वरूपी काय उपाययोजना करायच्या यावरही विचार सुरू आहे, असं वडेट्टीवर यांनी म्हटलं आहे. कोकण हा इको सेंसेटीव्ह झोन जाहीर करण्याची शिफारस गाडगीळ समितीने केली आहे, त्यामुळे नैसर्गिक वैभवाला छेडछाड केली तर असे परिणाम भोगावे लागतात, त्यामुळे कटू निर्णय घेण्याची गरज मला तरी वाटते असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 


पुरग्रस्त भागात एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम वेळेवर पोहचल्या नाहीत अशा तक्रारी आहेत, त्यामुळे जिल्ह्यात कायमस्वरुपी टीम तैनात केल्या पाहिजेत असा विचार आहे तसंच जिल्हा स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन केंद्र बळकट करण्यावर भर दिला अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.


राज्यातील नुकसानग्रस्तांना काय मदत करता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार असल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली. या बैठकीत शेती नुकसान, रस्ते, वीज नुकसान याबद्दल चर्चा करण्यात येईल तसंच डोंगराच्या पायथ्याशी असलेली गावं, पूर रेषेत असलेली गावं यांचं पुनर्वसन करणं याबाबतही चर्चा होणार आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आधी बैठक होणार आहे, नंतर मुख्यमंत्र्यांबरोबर संध्याकाळी चर्चा होणार आहे, आजच्या बैठकीत चर्चा होऊन उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत याला मान्यता दिली जाईल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.


मुसळधार पाऊस आणि पुरामुळे रस्ते आणि वीजेचं मोठं नुकसान झालं आहे, त्यासाठी अंदाजे 500 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे, तसंच ज्या गावांचं पुनर्वसन करायचं ती घरं म्हाडाने बांधावी आणि तिथल्या नागरी सुविधा शासन देईल असा विचार आहे, तीन टप्प्यात पुनर्वसन होण्याची आवश्यकता आहे अशी माहितीही विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.