मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS CHIEF Raj Thackeray ) यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे. स्वतः राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे. तर, रविवारी पुण्यातली सभा होणार असल्याचं स्पष्ट करतानाच या सभेत दौरा का रद्द केला याची माहिती देणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी मनसेनं केली होती. याच दरम्यान उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला होता.


खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी हा दौरा रद्द केल्याचे बोलले जात होते. मात्र, राज ठाकरे यांनी हा दौरा रद्द करण्यामागचे कारण पुढे आले आहे.


गेल्या मार्च महिन्यामध्ये टेनिस खेळताना राज ठाकरे पडले होते. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली. नंतर पायाचं दुखणं सुरू झालं. त्यामुळे एप्रिल महिन्यात त्यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आलं होतं. पण, त्यानंतरही हे दुखणं बरं झालं नाही.


त्यांच्या याच दुखऱ्या पायाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी त्यांना बाहेर न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या पायावर मे महिन्याअखेर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. ही शस्त्रक्रिया लिलावतीमध्ये होणार आहे. या कारणामुळेच अयोध्या दौरा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.